रामदास जावळे (वय ४७ वर्ष, रा. नागापूर ता. जालना, हल्ली मुक्काम चंदनझीरा) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. ते चंदनझीऱ्यातील नानासाहेब पाटील शाळेत मुख्याध्यापक होते. ते सोमवारी दुपारी आपल्या दुचाकीवरून डबल सीट जात असताना अपघात झाला.
भरधाव वेगात सिमेंट मिक्सर घेऊन जाणाऱ्या मोठ्या ट्रकचा धक्का लागल्याने ते दुचाकीवरुन फेकले गेले आणि ट्रकखाली चिरडले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीला कुठलीही इजा झाली नाही. मात्र जावळे ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
जावळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. मनमिळाऊ स्वभावाचे गुरुजी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रामदास जावळे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाचा आधार गेला आहे. घटनेची माहिती कळताच चंदनझीरा परिसरातील तसेच औद्योगिक वसाहत आणि जालना शहरातून नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली होती. त्यामुळे काही वेळ जालना औरंगाबाद मार्गावरील वाहतूक खोळंबली.
हेही वाचा : CCTV | कुत्र्यांना खाऊ घालताना जीपने उडवलं, लेकीची किंकाळी ऐकून आई आली, तोपर्यंत…
चंदनझीरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. जावळे यांचा मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जालन्याच्या शासकीय सामान्य रुग्णालयात पाठविला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. या अपघाताने जावळे यांचे परिवार निराधार झाले असून शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगला शिक्षक गमावला आहे.
हेही वाचा : चव्हाण कुटुंबावर आभाळ कोसळलं, बेपत्ता सख्ख्या बहिणी शिवारातील विहिरीत मृतावस्थेत