हा काय प्रकार? तीन दिवसांत ३१८ मुले करोना बाधित होऊनही मुलांचा वॉर्ड रिकामाच

हायलाइट्स:

  • अहमदनगर जिल्ह्यात तीन दिवसांत ३१८ मुलांना करोनाची बाधा
  • करोनाग्रस्त मुलं वाढूनही जिल्हा रुग्णालयातील मुलांचे वॉर्ड रिकामे
  • निर्बंध कायम असलेला नगर हा उत्तर महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा

अहमदनगर:अहमदनगर जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना यामध्ये १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाणही लक्षणीय आहे. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात एकूण २,८५६ रुग्ण आढळून आले, त्यामध्ये ३१८ मुलांचा समावेश आहे. यामध्ये ग्रामीण भागातील संख्या अधिक आहे. मुलांसाठी जिल्हा रुग्णालयात खास वॉर्ड तयार करण्यात आला असला तरी तेथे दाखल होणाऱ्या मुलांचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे या मुलांवर इतर रुग्णांसोबतच खासगी रुग्णालय किंवा घरीच उपचार केले जात असावेत, असे दिसून येते.

गेल्या काही दिवासांपासून नगर जिल्ह्यात करोनाचे आकडे फिरल्याचे पाहायला मिळत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्या साडेपाच हजारांवर गेली आहे. प्रशासन तिसऱ्या लाटेची तयारी करीत असताना दुसरीच लाट पलटून आल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे आता पुन्हा कडक उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. पारनेर आणि संगमनेर तालुक्यांतील अनेक गावांत कडक लॉकडाउन लावण्यात येत आहे. इतरही ठिकाणी आता लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

वाचा:पूरग्रस्तांच्या मदतीवरून सरकारला घेरणाऱ्या विरोधकांना उद्धव ठाकरेंचं कडक उत्तर

चाचण्या वाढल्यानंतर मुलांच्या बाबतीतील आकडे समोर आले आहेत. नव्याने दाखल झालेल्या रुग्णांचे वय पाहिले असता तीन दिवसांत १ ते १७ वयोगटातील ३१८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये १ ते १३ वयाचे १८४ तर १४ ते १७ वयोगटातील १३४ रुग्ण आहेत. २७ जुलैला ७९, २८ जुलैला १३५ तर २९ जुलैला १०४ मुले करोना बाधित आढळून आली आहेत. ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे. संगमनेर (५२), पारनेर (४८), कर्जत (३९), जामखेड (३०) या तालुक्यांत तुलनेत जास्त प्रमाण आहे.

रुग्ण संख्या वाढत असल्याने काही भागात सध्या घरोघरी जाऊन प्रत्येकाची चाचणी करण्यात येत आहे. त्यामध्ये ही मुले बाधित असल्याचे आढळून येत आहे. त्यांच्यात गंभीर लक्षणे दिसून येत नाहीत. चाचणीला सामोरे गेल्याने त्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. तिसऱ्या लाटेची पूर्व तयारी म्हणून जिल्हा रुग्णालयात आणि तालुक्यांच्या ठिकाणाही मुलांसाठी राखीव वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. मात्र, दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या नगण्य आहे. बाधित मुलांना फारसा त्रास किंवा लक्षणे नसली तरी इतरांसाठी ती सुपर स्प्रेडर ठरू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी वेळोवेळी दिलेला आहे. १८ वर्षांच्या वरील नागरिकांसाठी लस उपलब्ध झाली आहे. त्यांचे लसीकरणही सुरू आहे. मात्र, एकूण रुग्णांच्या वयोगटावर नजर टाकली असता त्यामध्ये १८ ते २५ वयोगटातील रुग्णांचीही संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येते. तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी आढावा बैठका आणि प्रत्यक्षात तयारीही करून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, या गडबडीत दुसरी लाट ओसरता ओसरता परत फिरल्याचे दिसून येत आहे. आता प्रशासन पुन्हा एकदा सक्रिय झाले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. असे असले तरी संभाव्य शिथीलता देण्यात येणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीतून नगर मात्र बाहेर पडले आहे. उत्तर महाराष्ट्रात निर्बंध कायम राहणारा नगर जिल्हा एकमेव ठरत आहे.

वाचा: छेडछाडीला कंटाळून दहावीच्या मुलींनी उचलले टोकाचे पाऊल

Source link

Ahmednagar Corona Cases latest UpdateAhmednagar CoronavirusAhmednagar Coronavirus News in MarathiCorona Cases in AhmednagarCorona Cases under 18 in Ahmednagarअहमदनगरकरोना व्हायरस
Comments (0)
Add Comment