माजी मंत्री, आमदार विनय कोरे हे दोन्ही काँग्रेस पक्षाची साथ सोडत भाजप आणि शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महायुतीत सहभागी झाले. अडीच वर्षापूर्वी महायुतीची सत्ता गेली. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतरही कोरेंनी भाजपची साथ सोडली नाही. भाजपला राम राम करणाऱ्या शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या मार्गावर कोरे गेले नाहीत. त्याचेच बक्षीस आता जनसुराज्य शक्ती पक्षाला मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महामंडळावर काहींना संधी देण्यात येणार आहे. त्याची यादी तयार करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. मंत्रीमंडळ विस्तारात कोरे यांना कॅबीनेट मंत्रीपद मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याशिवाय समीत कदम यांची महामंडळावर वर्णी लागणार असून त्याची सुरूवात म्हणून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. या कृतीतून भाजपने एकप्रकारे संकेतच दिले आहेत. गेल्या काही वर्षाची युवा आघाडीची धुरा सांभाळणाऱ्या कदम यांनी पक्षाची ताकद कायम राहण्यासाठी प्रयत्न केल्याने पक्षात त्यांना मानाचे स्थान आहे. याशिवाय ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून परिचीत आहेत.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात या पक्षाची काही प्रमाणात ताकद आहे. कोरेंना मंत्रिपद देत कोल्हापूरला तर कदमांना महामंडळ देत सांगली जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न भाजपचा राहील. या पक्षाच्या ताकदीचा उपयोग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला होणार आहे. इतर पक्षाप्रमाणे उपद्रवमूल्य नसल्याने जनसुराज्यला शक्ती देण्यात भाजपला अडचण नाही. यामुळेच मंत्रीपद आणि महामंडळाची ताकद या पक्षाला मिळणार आहे.