ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी, शिवसेनेतील फूट काल्पनिक असून, तिचा पक्षावर काहीही परिणाम झालेला नाही, असा दावा केला. ‘शिंदे गटाच्या याचिकेत अनेक त्रुटी आहेत. शिंदे गटाने त्यांच्यामागील ताकदीबाबत केलेल्या दाव्याची कागदपत्रे योग्य असतील तर त्यासाठी ओळखपरेड करण्यात यावी; आम्हीही ओळखपरेडसाठी तयार आहोत’, असा मुद्दा सिब्बल यांनी मांडला. आज शिंदे यांच्यासोबत जे आमदार आहेत ते सारे शिवसेनेच्याच चिन्हावर निवडून गेलेले आहेत, याकडे लक्ष वेधत, पक्षाच्या धोरणांनुसारच मतदार उमेदवारांना मते देत असतात, असेही सिब्बल यांनी नमूद केले.
तर, शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा ठाकरे गटाचा आक्षेप शिंदे गटाचे वकील, ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी फेटाळून लावला. आमच्याकडील कागदपत्रे योग्यच आहेत, असे सांगत, एखाद्या गटाने पक्षाने बाहेर पडण्यात बेकायदा काय आहे, असा प्रश्न जेठमलानी यांनी उपस्थित केला. शिंदे गटामागे संख्याबळ असल्याने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती जेठमलानी यांनी शिंदे गटाच्या वतीने निवडणूक आयोगाला केली.