२५ जणांकडून बलात्कार, पोटावर नावं लिहून भटकत राहिली; नगरच्या डॉक्टरांमुळे सुखरुप प्रसुती

अहमदनगर : अहमदनगरच्या शिंगवे नाईक येथील माऊलीसेवा प्रतिष्ठानच्या मनगाव प्रकल्पात नुकत्याच दाखल झालेल्या मनोविकलांग महिलेची प्रसूती करण्यात आली. तिला मुलगा झाला आहे. त्याचं नाव कबीर ठेवण्यात आलं. मात्र, त्याच्या जन्माची आणि आईच्या वेदनांची हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे. ही महिला सापडली तेव्हा सहा महिन्याचं पोट घेऊन विवस्त्र फिरत होती. या लादलेल्या गर्भारपणात तिची तिलाच स्वतःची घृणा वाटत होती. खूप रडायची, ओरडायची. अख्ख्या पुरुष जातीला शिव्यांची लाखोली वाहायची. प्रकल्पात आली त्या दिवशीच तिनं तिचं वाढलेलं पोट दाखवलं. त्या पोटावर रस्त्यावर तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांची नाव तिनं लिहून ठेवलेली होती. एक दोन तब्बल वीस पंचवीस नावं. प्रकल्पाचे प्रमुख डॉ. राजेंद्र धामणे यांनी या महिलेची करुण कहाणी सोशल मिडियावर शेअर केली आहे.

नगर-मनमाड महामार्गावरील शिंगवे नाईक येथे डॉ.राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे या दाम्पत्याने मनगाव प्रकल्प सुरू केला आहे. मनोविकलांग महिलांवर येथे वैद्यकीय उपचार व समुपदेशन होते. बर्‍याचदा या महिला बर्‍या होऊनही त्यांचे कुटुंबीय त्यांना स्वीकारत नाहीत. त्यामुळे त्या मनगावमध्येच राहतात. त्या स्वावलंबी होण्यासाठी विविध प्रकल्पही मनगावमध्ये राबवले जातात. या परिवारात नुकत्याच काही दिवसांपूर्वी गर्भवती असलेल्या मनोविकलांग महिलेला दाखल केले आहे. तिची प्रसुती होऊन तिला मुलगा झाला आहे. मनोविकलांगतेचा त्रास सहन केलेल्या वा करीत असलेल्या मिळून तब्बल ४५२ महिला व ३८ मुले या प्रकल्पात आहेत. आता ३९ व्या कबीर या मुलाची त्यात भर पडली आहे. स्रीरोग व प्रसूतीशास्र तज्ञ डॉ. गणेश बडे व डॉ. छाया बडे यांनी या महिलेची सुख़रूप प्रसुती केली.

नेमकं काय घडलं होतं?

डॉ. राजेंद्र धामणे यांनी या महिलेची करुण कहाणी सोशल मिडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की,
अत्याचाराने मानसिक विकलांग झालेल्या माऊलीच्या घरात नुकतंच एक बाळ जन्मलं. माऊलीच्या मायभगिनी आणि लेकरांची प्रत्येकाची अशी एक विशिष्ट कथा आहे. तशीच हीपण. ती दूरची तिकडच्या कुठल्यातरी हिंदी भाषिक ठिकाणच्या आसपासची. २३-२४ वय. शिक्षण सुरु होतं. त्याबरोबर काम करुन मोडकळीला आलेल्या तिच्या घराला हातभार लावणं सुरु होतं. बर्‍याचदा अशा सालस आणि घरासाठी राबणार्‍या मुली तुटलेल्या नात्यांच्या कुटुंबात असतात. नेटानं काम करुन ही नाती जोडत आपलं घर सांधण्याचा त्या प्रयत्न करतात.

पण परिस्थिती आणि आजूबाजूची माणसं ते होऊ देत नाहीत. न कळत्या वयाच्या ११ व्या वर्षी तिच्यावर नात्यातीलच एक व्यक्ती पहिला बलात्कार करतो. मग हे हळूहळू सुरूच राहते. ती कोमजल्या मनाने हे सहन करीत शिक्षण सुरु ठेवते, कामही करीत राहते. कुटूंबातील कुरबुरी ,कुणाचाही आधार मिळत नाही. जो भेटेल तो हिच्या शरीराची आस धरून जवळीक साधणारा. तिच्या मनाचा आणि परिस्थितीचा या बाजाराने घोट घेतलेला. हळूहळू ती कोलमडत गेली, मनाने खंगली. त्या परिस्थितीत तिला अनेकांनी कामवासनेच्या बाजारात उघडं-नागडं केलं. ती सापडली तेव्हा सहा महिन्याचं पोट घेऊन फिरत होती. तिला काही कर्तव्यदक्ष पोलिसांनी माऊलीला मनगावी आणलं. शेवटचे तीन महिने आम्हाला मिळाले. त्यात तिची मानसिकता आणि पोटातील बाळाची काळजी घेणं तारेवरची कसरत. त्यात तिचे अधूनमधून उफाळून येणारे मानसिक आजाराची तीव्र लक्षण आणि डोहाळेही. हे बाळंतपण नॉर्मल होईल असे वाटत नव्हतेच.नगरचे प्रसिद्ध स्रीरोग व प्रसूतीशास्र तज्ञ डॉ. गणेश बडे व डॉ. छाया बडे यांनी या महिलेच्या प्रसुतीची जबाबदारी स्वीकारली. आई व बाळाचा जीव वाचवण्यासाठी सिझेरियन केले. आमच्या या ३९ व्या लेकराचा जन्म झाला, असे डॉ. धामणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Source link

ahmednagar local newscrimemauli pratishthan mangaonraperape victim women give birth to childwomen raped by 25 peopleमाऊली सेवा प्रतिष्ठान मनगाव
Comments (0)
Add Comment