पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची मराठीतून सुरुवात
मुंबईतील सर्व बंधू भगिनींना नमस्कार म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भाषणाची सुरुवात करण्यात आली. मुंबईच्या विकासासंबंधी ४० हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचं लोकार्पण, उद्घाटन आज झालं. मुंबईच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या वाहतूक व्यवस्थेच्या विकासासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास, मेट्रोची काम, रस्त्याची काम सुरु होत आहेत. ते अत्यंत गरजेचं होतं. मुंबई शहराला चांगलं बनवण्यात याची महत्त्वाची भूमिका असेल. मुंबईतील रस्त्यावरील विक्रेत्यांच्या खात्यात पीएम स्वनिधी योजनेचे पैसे पोहोचले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं सुरु होणारा आपला दवाखाना या सर्व गोष्टींसाठी मुंबईकरांना मी शुभेच्छा देत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताबद्दल जगभरात सकारात्मक वातावरण
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आज भारत मोठी स्वप्न पाहणे आणि ती पूर्ण करण्याचं साहस करत आहे. आमच्याकडे मागच्या पिढीतील एक काळ, गरिबीची चर्चा करणे, जगातून मदत मागणे यात गेला. आता जगाला भारताच्या संकल्पांवर विश्वास आहे हे पहिल्यांदा होत आहे. स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवाची भारताला जितकी उत्सुकता आहे तितकाच उत्साह जगभरात आहे. एकनाथ शिंदे डावोसचा अनुभव सांगत होते, असाच अनुभव जगभर आहे. भारताबद्दल जगभर सकारात्मक वातावरण आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं
भारत आपल्या सामर्थ्याचा सदुपयोग करत आहे. आज सर्वांना वाटत आहे, भारत जे करत आहे ते वेगवान विकासासाठी आवश्यक आहे. भारत आत्मविश्वासानं वाटचाल करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून स्वराज्याची भावना डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून पुढं जात आहे, असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
जगभरातील अर्थव्यवस्था अडचणीत भारतात स्थिती वेगळी
नरेंद्र मोदींनी आपण गरिबांच्या पैशांचा घोटाळा होत असल्याचं पाहिलं असल्याचं म्हटलं. करदात्यांच्या पैशाचा हिशोब नसायचा. गेल्या आठ वर्षांमध्ये परिस्थिती बदलली असून आज भारत भविष्यातील विचार आणि आधुनिकता यावर चालत आहे. भारत एका बाजूनं घर, वीज, पाणी, शिक्षण, एम्स, आयआयटी यासारख्या गोष्टी वेगान होत आहे. याशिवाय आधुनिक वाहतूक व्यवस्था देखील निर्माण होत आहे, असं मोदी म्हणाले.
देशात आजची गरज आणि भविष्यातील आवश्यकता यावर एकत्रितपणे काम सुरु आहे. जगातील मोठ्या अर्थव्यवस्था अडचणीत आहेत. त्याकाळात भारत ८० कोटी गरिबांना रेशन देऊन त्यांची व्यवस्था करत आहे, असं मोदी म्हणाले.
नाव न घेता मविआ सरकारला टोला
विकसित भारताच्या निर्माणात आपल्या शहरांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. यामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर येणाऱ्या २५ वर्षांमध्ये महाराष्ट्रातील अनेक शहरं भारताच्या विकासाला गती देणार आहेत. यामुळं मुंबईला भविष्याच्या दृष्टीनं तयार करणं डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
२०१४ पर्यंत मुंबईत १० ते १२ किलोमीटर मेट्रो सुरु होती. डबल इंजिन सरकार बनवल्यानंतर त्याचा वेग वाढला. काही काळ काम संथगतीनं सुरु होतं. शिंदे फडणवीसांचं सरकार आल्यानंतर वेग पुन्हा वाढला. मेट्रोचं नेटवर्क ३०० किमीपर्यंत नेण्यात येणार आहे, असं मोदींनी म्हटलं.
मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणावर भाष्य
नरेंद्र मोदी यांनी रेल्वेला आधुनिक करण्याचं काम सुरु असून मुंबई लोकलच्या विकासाचा देखील प्रयत्न आहे, असं म्हटलं. डबल इंजिन सरकार सामान्य माणसाला विकासाचा लाभ देण्याचं काम करणार आहे. रेल्वे स्टेशनला विमानतळांसारखं विकसित केलं जाणार आहे. देशातील सर्वात जुनं रेल्वेस्टेशन विकसित करत आहोत. २१ व्या शतकाच्या काळाप्रमाणं त्यात बदल होतील. सामान्य प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात. हे रेल्वे स्टेशन रेल्वे सेवेसोबत बसेस, मेट्रो, टॅक्सी सेवेशी जोडले जाईल. यामुळं प्रवाशांना लाभ होईल. मल्टी मॉडेल कनेक्टिव्हीटी देशभर विकसित करत आहोत, असं मोदी म्हणाले.
आधुनिक होत असलेल्या मुंबई लोकल, मेट्रोचं व्यापक नेटवर्क, दुसऱ्या शहरांतून वंदे भारत, बुलेट ट्रेनची वेगवान कनेक्टिव्हीटी येणाऱ्या काळात मुंबईचा कायापालट करणार आहे. गरीब, मजूर ते कर्मचारी, दुकानदार आणि व्यवसाय सांभाळणाऱ्यांना इथं राहणं सुविधाजनक होईल. इतर जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्यांना देखील इथं पोहोचणं सुकर होईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले. धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास पुन्हा ट्रॅकवर येत आहे. यासाठी मी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो. मुंबईच्या रस्त्यांच्या विकासासाठी जे काम सुरु आहे ते देखील महत्त्वाचं आहे, असंही मोदी म्हणाले.
आज आपण शहरांच्या संपूर्ण बदलासाठी काम करत आहोत. इलेक्ट्रिक वाहतूक व्यवस्थेवर लक्ष देत आहोत. बायोफ्युएल, हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांबाबत काम सुरु आहोत. कचऱ्यातून समृद्धीचं अभियान सुरु आहे. नदीत दूषित पाणी मिसळू नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत, असं मोदींनी म्हटलं.
अर्थसंकल्पानंतर कशी असेल बाजाराची वाटचाल? जाणून घ्या याआधी नेमकं काय घडलं
उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका
शहरांच्या विकासासाठी देशाकडे राजकीय इच्छाशक्ती किंवा अन्य कोणत्याही गोष्टींची कमी नाही. मुंबई सारख्या शहरात विकास प्रकल्प वेगात होऊ शकत नाही. जोपर्यंत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची भूमिका वेगवान विकासाची असत नाही, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. राज्यात वेगवान विकासाची दृष्टी असेल तर मुंबई महापालिकेत देखील वेगवान विकासाची भूमिका असावी. मुंबईचा पैसा भ्रष्टाचारात, बँकांमध्ये पडून असेल तर कसं होईल, असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केला. मुंबई विकासासाठी वाट पाहत असेल तर २१ व्या शतकातील भारताला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हे सहन होणार नाही, असं मोदी म्हणाले.
मुंबईत विकासाच्या आड येण्याचं काम झालं
नरेंद्र मोदी यांनी भाजपचं सरकार असेल, एनडीएचं सरकार विकासाच्या आड राजकारणाला आणत नाही, असं म्हटलं. राजकीय स्वार्थासाठी भाजप आणि एनडीए सरकारं विकासाच्या आड येत नाहीत. आम्ही यापूर्वी मुंबईत अनेकदा तसं होत असल्याचं पाहिलं आहे, असं मोदी म्हणाले. पीएम स्वनिधी योजनेच्याबाबतही तसं झालं.
स्वनिधी योजनेवरुन टीका
शहरातील फेरीवाल्याचं शहरांच्या विकासात योगदान आहे. देशातील ३५ लाख फेरीवाल्यांना लाभ झाला आहे. महाराष्ट्रातील ५ लाख जणांना लाभ झाला आहे. आज १ लाख लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, असं मोदी म्हणाले. हे पूर्वीच व्हायला हवं होतं. मधल्या काळात डबल इंजिन सरकार नसल्यानं याचं नुकसान लोकांना सहन करावं लागलं, असं पुन्हा होऊ नये, असं मोदी म्हणाले. एक प्रकारे नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे, मविआ सरकारचा नामोल्लेख टाळत टीका केली. स्वनिधी योजना फक्त कर्ज योजना नाही. फेरीवाल्याचं सामर्थ्य वाढवण्याचं साधन आहे. स्वाभिमानाची गोष्ट आहे. डिजीटल व्यवहारांसाठी ३२५ प्रशिक्षण कार्यक्रम झाले आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले. स्वनिधीच्या लाभार्थ्यांनी ५० हजार कोटींचे डिजीटल व्यवहार केले आहेत. फेरीवाल्यांचा पराक्रम निराशावाद्यांसाठी उत्तर आहे. डिजीटल इंडियाचं यात यश आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
द्विशतकवीर शुभमन गिल झाला भारताचा नवा सुपरस्टार; २३ व्या वर्षी इतकी संपत्ती जमवली
तुम्ही १० पावलं चाला, मी अकरा पावलं चालेन
सर्वाचं प्रयत्न असेल तर आपण मिळून मुंबईला विकासाच्या वाटेवर घेऊन जाऊया, तुम्ही १० पावलं चाला मी ११ पावलं चालण्यास तयार आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. मी यासाठी सांगत आहे की माझे फेरीवाला भाऊ बहीण सावकारांकडे जात होते. सावकारांच्या जाचातून वाचवण्यासाठी स्वनिधी योजना आहे, असं मोदी म्हणाले. जेवढा डिजीटल व्यवहार कराल तेवढं तुम्हाला व्याज लागणार नाही. तुमचे पैसे वाचतील, तुमच्या मुलांच्या भविष्याचं काम होईल. तुम्ही १० पावलं चाला मी ११ पावलं चालेन, असं मोदी म्हणाले.
शिंदे फडणवीस जोडीवर नरेंद्र मोदींचा विश्वास
देशाच्या विकासासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे. संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशवासियांना विकासासाठी शुभेच्छा देतो. शिंदे फडणवीसांची जोडी तुमच्या स्वप्नांचा विकास करेल, हा माझा विश्वास आहे, असं मोदी म्हणाले.
दावोसमध्ये मला लक्झेमबर्गचे पंतप्रधान भेटले अन् म्हणाले मैं मोदीजी का भक्त हूं : एकनाथ शिंदे