शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन; ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हायलाइट्स:

  • माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन
  • सोलापुरातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
  • राज्यभरातील नेत्यांकडून शोक व्यक्त

सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. गणपतराव देशमुख यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र आज सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक ढासळली आणि रात्री ९ च्या सुमारास त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

गणपतराव देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. सर्वाधिक वेळा विधानसभेत निवडून जाणारे आमदार म्हणून देशमुख यांची ओळख होती.

२००९च्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. एक पक्ष, एक मतदारसंघ आणि एकच नेता असा विश्वविक्रमी सांगोल्याचा वारसा आज हरपला आहे.

अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केलं आहे.

देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२ च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली. २०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता. गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र १९७८ मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले तेव्हा आणि १९९९ मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

दरम्यान, माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यभरातून विविध नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी गणपतराव देशमुख यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली.

Source link

Ganpatrao Deshmukhsolapur newsगणपतराव देशमुखशेकापसोलापूर
Comments (0)
Add Comment