गुंदवली हे स्थानक मेट्रो १वरील पश्चिम द्रुतगती मार्ग स्थानकाला लागून आहे. या स्थानकावरून मेट्रो १ देखील गाठता येते. पण गुरुवारी उद्घाटनावेळी पंतप्रधान गुंदवली येथे असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो १ बंद करण्यात आली होती. सायंकाळी ५.४५ ते ७.३० दरम्यान घाटकोपर ते वर्सोवा आणि वर्सोवा ते घाटकोपर या दोन्ही मार्गिका स्थगित करण्यात आल्या होत्या. त्याचा मोठा फटका चाकरमान्यांना बसला. या दोन्ही मार्गिकांचा सर्वाधिक उपयोग अंधेरी, साकीनाका, मरोळ व असल्फा येथील प्रवासी करतात. सकाळी घाटकोपरहून वर्सोवाकडे जाताना या स्थानकांवर उतरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. तर सायंकाळी वर्सोवाहून घाटकोपरला येणारी मेट्रो अंधेरीपासून मरोळ, साकीनाका, असल्फावरून भरत येते. या भागात सर्वाधिक कार्यालये आहेत. ही सर्व कार्यालये साधारण सायंकाळी ६ ते ८ दरम्यान सुटतात. मात्र नेमक्या त्याचवेळी सेवा ठप्प केल्याने त्यांना खोळंबून राहावे लागले. तर सेवा सुरू झाल्यानंतर साडेसात ते रात्री साडेनऊ दरम्यान खोळंबलेल्या चाकरमान्यांची गर्दी झाल्याने घाटकोपर दिशेने येणाऱ्या मेट्रो रेल्वे भरून आल्या.
या मार्गिकेवर सध्या दररोज सरासरी ३ लाख प्रवाशांची ये-जा आहे. साधारण दोन तास ऐन गर्दीवेळी मार्गिका ठप्प होती. त्यानुसार जवळपास ५५ हजार प्रवासी खोळंबले होते.