या मतदारसंघात काँग्रेसचे सत्यजीत तांबे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहे. डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजीत यांनी पक्षशिस्तीचा भंग केला म्हणून पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. तर दुसरीकडे शुभांगी पाटील यांना शिवसेनेने पुरस्कृत केले असून त्याच महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचे जाहीर केले आहे. या सर्व प्रक्रियेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची मोठी कोंडी झाली आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला गेले असता ते घसरून पडल्याने त्यांचा खांदा दुखवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू आहे. त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याने त्यानंतर त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलेला आहे, असे सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर आज संगमनेरमध्ये त्यांच्या निवासस्थानी शुभांगी पाटील यांना प्रवेश नाकारण्याचा किस्सा घडला. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह पाटील मोटारीतून थोरात यांच्या निवासस्थानी आल्या. तेव्हा मुख्य प्रवेशद्वार बंद होते. त्यांनी फटीतून आतील कर्मचाऱ्याशी संवाद साधला. आपला परिचय करून दिला. थोरात किंवा त्यांच्या कुटुंबीयांना भेटायचे असल्याचे सांगितले. मात्र, आतील कर्मचाऱ्याने घरी कोणीच नसून सर्वजण मुंबईला गेल्याचे सांगितले. त्यानंतर पाटील यांनी कोणाला तरी फोन केला. पलीकडूनही घरी कोणीच नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाटील आल्या पावली परतल्या.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाटील यांना थोरात यांच्या घरी प्रवेश नाकारल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे थोरात सध्या मुंबईत उपचार घेत असल्याचे माहिती असूनही पाटील त्यांच्या संगमनेरमधील घरी कशा आल्या? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर थोरात यांच्या निवासस्थानी कोणालाही प्रवेश नाकारला जात नाही. सध्या कुटुंबीय घरी नाहीत, तसेच बंगल्यावरील कर्मचाऱ्याच्या कोण आहे, ते लक्षात आले नसेल, त्यामुळे असे घडले असावे, असे थोरात यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.