बुलडाणा जिल्ह्यातील जामोद गावातील घरातील सिलिंडरच्या नळीने पेट घेतल्यामुळे घराला आग लागली. या आगीत घरातील जीवनावश्यक साहित्यासह आठ ते दहा क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. या घटनेत घरमालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना २० जानेवारी रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास शहरातील रुपलाल नगरात घडली. शहरातील रूपलालनगरमधील भास्कर भिकाजी ताडे यांच्या मुलीने चहा करण्यासाठी गॅस पेटवला. यावेळी शेगडीला लागून असलेल्या रबरी नळीने अचानक पेट घेतला. काही वेळातच रेग्युलेटर निघाल्यामुळे सिलिंडरने पेट घेत घराला कचाट्यात घेतले.
वाचाः आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा विहिरीत सापडला मृतदेह, नाशिकमधील समृद्धी महामार्गाजवळ…
घराला आग लागल्याचे समजतात शेजाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये त्यांना अपयश आले. त्यानंतर पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यंत घरातील आठ ते दहा क्विंटल कापूस, टीव्ही, कुलर, दोन क्विंटल गहू, यासह इतर साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेत घर मालक भास्कर ताडे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. घटनेचा पंचनामा तलाठी मोरे यांनी केला.
वाचाः १७ दिवसांपूर्वी बाप-मुलाने मिळून केली चुलत काकाची हत्या; शवविच्छेदन करताच झाली पोलखोल