तेजस संजय बधे (वय १९), उदय सिद्धार्थ कांबळे (वय १९), प्रसाद ऊर्फ बाबू धनंजय सोनवणे (वय १९, तिघेही रा. थेऊर, ता. हवेली), रोहित राजू जाधव (वय २०, रा. लोणी काळभोर, ता. हवेली), संग्राम भगवान थोरात (वय २८, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली), श्याम गुरप्पा जाधव (वय. ४३, रा. वानवडी, पुणे) तसेच आणखी तीन अल्पवयीन बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे शहर आणि परिसरात वाढत्या गुन्हेगारीबाबत पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी हडपसर आणि लोणी काळभोर परिसरात अल्पवयीन पोरं सोशल मीडियावर कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील धारदार कोयते ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या रोहित जाधव याच्याकडे कोयते आढळून आले आहेत.
सध्या कोयते घेऊन त्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न तरुण मुलं करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने अल्पवयीन बालकांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे. म्हणून याची गंभीर दखल घेऊन यापुढे अल्पवयीन बालकांवर देखील कडक कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासन करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अल्पवयीन मुलांचा सहभाग गुन्हेगारीत वाढत असल्याने पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले.