राजधानी मुंबई येथे दोन दिवसांपूर्वी पाथरी येथील शिंदे गटाचे नेते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाथरी तालुक्यातील ४० सरपंचांनी ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’त प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला होता. हा दावा राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी खोडून काढला आहे. मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करण्याचे काम पाथरीतील एका आरोपीकडून केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
ईडीने काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतलेला आरोपी सईद खान यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशाच्या वेळी आरोपी वली पाशा कुरेशी, पाईप चोरीतील आरोपी शाकीर सिद्दिकी, नाना टाकळकर, वाळू माफिया सईद खान, अशा आरोपींनी मुख्यमंत्र्यांपर्यंत फोटो सेशन केलं, ही गंभीर बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रवेश देत असताना सर्वांची शहानिशा करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी जेवढ्या लोकांना प्रवेश दिलेत, त्यांच्याविषयी परभणी पोलीस अधीक्षकांकडून माहिती घ्यावी. प्रवेश केलेल्या व्यक्तीवर कोणते गुन्हे आहेत याची देखील माहिती घ्यावी, असं बाबाजानी दुर्रानी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर कोणत्या लोकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय, याची माहिती त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. शेवटी आपापला पक्ष वाढविण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र पक्ष वाढवत असताना कोणते लोक प्रवेश करताहेत, याची शहानिशा प्रमुखांनी करणे गरजेचे आहे, असंही बाबाजानी दुर्रानी म्हणाले.