Maghi Ganesh Jayanti 2023 : सर्वांचा पूजनीय आणि लाडका गणपती बाप्पा यास विघ्नहर्ता, गणेश, बुद्धीदाता, एकदंत, गणेशाय, गणाध्यक्षाय असे अनेक नावे आहेत. तसेच गणपतीचे तीन अवतार समजले जातात. यामागे काय मान्यता आहे तसेच माघी गणेश जयंतीचे महत्व, पूजाविधी, मुहूर्त, शुभ योग सर्व काही सविस्तर जाणून घेऊया.
माघी गणेश जयंती प्रारंभ आणि समाप्ती
पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील गणेश विनायक चतुर्थी २४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी २५ जानेवारी २०२३ रोजी चतुर्थी तिथी दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांनी समाप्त होईल.
मुहूर्त आणि शुभ योग
गणेश जयंती पूजा मुहूर्त :
सकाळी ११ वाजून ३४ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ३४ मिनिटे.
शुभ योग :
बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. अशा परिस्थितीत बुधवारी गणेश जयंती असल्याने त्याचे महत्त्व वाढले आहे. यंदा गणेश जयंतीला रवियोग असून, त्यानंतर शिवयोग सुरू होईल. रवियोगात गणपतीची पूजा केल्याने कामातील अडथळे दूर होतील.
माघी गणेश जयंती पूजा विधी, महत्व आणि मान्यता
माघ महिन्यातील गणेशजयंतीला धातूच्या, पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेशमूर्तीची पूजा करावयाची असते. प्रथम प्राणप्रतिष्ठा करून मंत्रांनी मूर्तीमध्ये देवत्त्व आणले जाते. चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापित करून शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. गणपतीसह महादेव, गौरी, नंदी, कार्तिकेयसह शिव कुटुंबाची पूजा विधिपूर्वक करावी. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले, लाल फुले, दुर्वा वाहाव्यात. गणपती अथर्वशीषाचा पाठ करून नैवेद्य दाखवावा.
गणेश जयंतीला चंद्र दर्शन निषिद्ध मानले गेले आहे. या रात्री चंद्र दर्शन केल्याने मानसिक विकार उत्पन्न होऊ शकतात, अशी धारणा आहे. या दिवशी सकाळी चंद्र उगवतो. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. अग्निपुराणमध्ये मोक्ष प्राप्तीसाठी तीलकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहे.