विधानभवनातील बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते अजित पवार, अंबादास दानवे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. ठाकरे कुटुंबातून स्मिता ठाकरे, निहार ठाकरे हजर होते. मात्र बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यापैकी कोणीही हजर नव्हते. यावरुन राज ठाकरेंनी टोला लगावला.
राज ठाकरे काय म्हणाले?
या परदेशी लोकांचं काय होत असेल, हा प्रश्न मला पडलाय, असं राज ठाकरे म्हणताच सभागृहात हशा पिकला. यांना नंतर कोणीतरी समजवून सांगा की कार्यक्रम कशासाठी होता. आपण तामिळनाडूच्या सभागृहात गेल्यावर काय होत असेल, ते मला समजलं. तैलचित्र म्हणजे ऑईल पेंटिंग हे सतत सांगाला हवं, अशी विनोदी शैलीत राज ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली.
जवळपास सव्वातीन वर्षांनंतर, मुंबईतील होर्डिंगसमोर आणि इथेही बाळासाहेबांच्या नावाअगोदर हिंदूहृदयसम्राट हे नाव लागतंय. त्याबद्दल राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, आज इथे उपस्थित असलेले अनेक जण आणि नसलेले अनेक जण. ज्या व्यक्तींमुळे तुम्हाला ही इमारत पाहायला मिळाली, त्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण आज इथे होतंय, बाळासाहेबांनी शेकड्याने या लोकांना इथे पाठवलं. माझी राहुल नार्वेकरांना विनंती आहे, की आणखी दोन तैलचित्रं – विधानपरिषदेच्या सभागृहात आणि विधानसभेच्या खाली लावावीत, म्हणजे अनेकांना कळेल आपण कोणामुळे इथे आलो, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी एक जुना किस्साही सांगितला. ९० च्या दशकात शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन युती अडत होती. दुपारी मातोश्रीबाहेर दोन गाड्या लागल्या. त्यावेळी प्रकाश जावडेकर आणि दोन-चार जण आले, आणि म्हणाले की आम्हाला बाळासाहेबांना भेटायचंय. आज आपलं सरकार बसतंय. सुरेशदादा जैन हे युतीचे मुख्यमंत्री असतील, ते आमदार खेचून आणतील. बाळासाहेब त्यावेळी झोपले होते, मी त्यांना उठवून त्यांचा निरोप सांगितला. बाळासाहेब म्हणाले, त्यांना सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच असेल, दुसरा कोणी नाही, असं म्हणून ते वळून झोपले. बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी सत्तेला लाथ मारली, अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली.
हेही वाचा : जेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या एका वाक्यावर १० लाखांचा उसळलेला जनसमुदाय शांत झाला होता…!