बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाच्या कार्यक्रमात नीलम गोऱ्हे राणेंवर संतापल्या

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. शिंदे-फडणवीस सरकारने या कार्यक्रमाची जोरदार हवा केली होती. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांदेखत माजी शिवसैनिक असलेले नारायण राणे (Narayan Rane) आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमात अनेक नेत्यांची भाषणं झाली. यामध्ये नारायण राणे यांचाही समावेश होता. परंतु, भाषणादरम्यान त्यांनी औचित्यभंग केल्याने नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप घेतला. परंतु, नारायण राणे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधाला न जुमानता आपले भाषण सुरुच ठेवले आणि गोऱ्हे यांना सर्वांदेखत टोलाही लगावला. हा सगळा प्रकार घडत असताना नीलम गोऱ्हेही प्रचंड आक्रमक झाल्या होत्या. त्यांनीही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सांगून नारायण राणे यांचे भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, नारायण राणे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे विविध देशांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांसमोर दोन्ही राजकीय नेत्यांनी चांगलीच शोभा करुन घेतली.

नेमकं काय घडलं?

बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देताना नारायण राणे यांनी त्यांना मानसिक त्रास कुणी दिला, याबाबत बोलायला सुरूवात केली. यावर नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप घेतला. तसेच नारायण राणे यांचे भाषण सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ उठून सभागृहातून बाहेर पडले. यावेळी नारायण राणे यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावर भुजबळ हे नारायण राणे यांना हात दाखवून पुढे गेले. त्यावर नारायण राणे यांनी शाब्दिक कोटी करण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे म्हणाले की, मला छगन भुजबळ यांचे समर्थन आहे. त्यामुळेच त्यांनी मला हात दाखवला. त्यामुळे औचित्यभंग झाल्याचा मुद्दा उपस्थित करत नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप नोंदवला. नीलम गोऱ्हे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सांगून नारायण राणे यांचे भाषण थांबवण्याची मागणी केली. पण नारायण राणे यांनी भाषण थांबवण्यास नकार दिला. राणेंनी ‘मी नाही थांबणार’ असं म्हटलं. “मी बसून बोलणाऱ्यांची ऐकत नसतो”, असा टोलाही राणे यांनी गोऱ्हे यांना लगावला. यानंतर नीलम गोऱ्हे यांनी राहुल नार्वेकर यांच्या दिशेने पाहत, ‘हे काय चाललंय? कितीवेळ चालणार?’, असे म्हणत पुन्हा एकदा नापंसती व्यक्त केली. त्यानंतर नारायण राणे यांनी थोड्यावेळातच आपले भाषण आवरते घेतले.
तुम्हाला शेवटचा नमस्कारही करु शकलो नाही, मला क्षमा करा; बाळासाहेबांच्या आठवणीने नारायण राणे व्याकुळ
विधानभवनातील बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते अजित पवार, अंबादास दानवे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. ठाकरे कुटुंबातून स्मिता ठाकरे, निहार ठाकरे हजर होते. याशिवाय, अनेक देशांचे वाणिज्य दूत या कार्यक्रमाला हजर होते.

शाळेतील गणित आणि मराठीचा टॉपर विद्यार्थी, पेपरची लाईन टाकायला १५ रुपये पगार; नारायण राणेंची संघर्षगाथा

बाळासाहेब ठाकरेंचं ठरलेलं तैलचित्र लागलंच नाही

विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये चित्रकार चंद्रकला कदम यांनी काढलेले बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लागणार होते. परंतु, या तैलचित्राच्या दर्जावरुन अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे ऐनवेळी चंद्रकला कदम यांच्याऐवजी किशोर नादावडेकर यांनी काढलेले बाळासाहेबांचे तैलचित्र सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात आले. तर चंद्रकला कदम यांनी काढलेले तैलचित्र मुख्यमंत्र्यांच्या दालनात लावले जाणार असल्याची चर्चा आहे.

Source link

balasaheb thackeray oil paintingbjpMaharashtra politicsNarayan Raneneelam gorheनारायण राणेनीलम गोऱ्हेबाळासाहेब तैलचित्र विधानसभा
Comments (0)
Add Comment