सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रहार पाटील यांनी यासंदर्भात भाष्य केले. महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा सांगलीत झाल्या तर त्या विना तक्रार आणि वादा-विना होऊ शकतात. हे कुस्ती स्पर्धा यशस्वी करून दाखवून देऊ. त्यानंतर कुस्तीचा सांगली पॅटर्न महाराष्ट्रात सुरू होईल,असा विश्वास देखील पैलवान चंद्रहार पाटलांनी व्यक्त केला आहे. तसेच पैलवानावर आज अन्याय झाल्यास,तो आत्महत्येच्या विचारापर्यंत जातो. मी देखील महराष्ट्र केसरी स्पर्धेत माझ्यावर झालेल्या अन्यायानंतर आत्महत्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलो होतो. मात्र, मी त्यातून सावरलो आहे. पण ज्या चार माकडांनी माझ्यावर अन्याय केला, त्यांना माझं सांगणं आहे, की कोणत्याही पैलवानावर आता अन्याय करू नका, असे चंद्रहार पाटील यांनी यांनी म्हटले.
यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे गाजली होती. माती विभागाच्या अंतिम फेरीत सिकंदर शेखला पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात प्रतिस्पर्धी महेंद्र गायकवाडला एकाचवेळी तब्बल चार गुण देण्यात आले आणि तिथेच हा सामना फिरला होता. सिकंदर शेख हा महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानला जात होता. परंतु, पंचांच्या वादग्रस्त निर्णयाने सिकंदरचा पराभव झाला होता. त्यामुळे महाराष्ट्र केसरीच्या विजेत्यापेक्षा सिकंदर शेखचीच प्रचंड चर्चा रंगली आहे.
कुस्तीसम्राट अस्लम काझींचा खळबळजनक दावा
महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करताना, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची संपूर्ण सहमती असणे आवश्यक आहे. पुण्यात महाराष्ट्र केसरीच्या ज्या स्पर्धा झाल्या, त्या अनधिकृत आहेत. कारण महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या विश्वस्तांबाबत कोर्टात प्रकरण चालू आहे. याचे प्रमुख आजही राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार व बाळासाहेब लांडगे हेच आहेत. कोर्टाने देखील यांच्या बाजूने निकाल दिला आहे, परंतु रामदास तडस यांनी शरद पवार किंवा बाळासाहेब लांडगे यांना विश्वासात न घेता, महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केल्या. त्यामुळे ही स्पर्धाच अनधिकृत होती, असा आरोप कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी केला होता.
परंतु, नवीन संघटना स्थापन करून वेगळी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवणे अशक्य असल्याचे काझी यांनी म्हटले होते. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद या संस्थेची धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंद आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा याचे नाव देखील दुसऱ्या कुस्ती संघटनेला वापरता येत नाही. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या परवानगी शिवाय असे करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे परवानगीशिवाय अन्य ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करणे अवघड असल्याचे मत अस्लम काझी यांनी केले होते.