भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर जवळच्या भीमा साखर कारखान्यावर भीमा केसरी कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सिकंदर शेख आणि पंजाब केसरी भूपेंद्र अजनाळ यांच्यात मुख्य कुस्ती होणार आहे.
त्यापूर्वी सिकंदर शेख याने कुस्ती मैदानाला अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्याने महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी मीच आहे, असा दावा केला आहे. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत मी हरलो असलो तरी महाराष्ट्रातातील जनतेला माहिती आहे असं म्हणत त्याने पंचांच्या निर्णयाबद्दल खंत व्यक्त केली.
महाराष्ट्र केसरीनंतर पहिल्यांदाच मोठ्या मैदानात खेळतोय. आणि जनता एवढं माझ्यावर प्रेम करतेय, हे पहिल्यांदाच बघतोय
उगाच म्हणत नाहीत की सगळ्यांच्या मनातला महाराष्ट्र केसरी मी आहे, जरी मी स्पर्धेत हरलो असलो तरी सगळ्यांच्या मनात मीच महाराष्ट्र केसरी आहे, हे सगळं प्रेम बघून खूप आनंद झाला, अशा भावना सिकंदरने व्यक्त केल्या.
आज पंजाब केसरीसोबत होणारी लढत रंगतदार होईल असे सांगताना यापूर्वी झालेल्या दोन लढतीत मी त्याच्या सोबत जिंकलोही आहे, आणि हरलोही असल्याचे त्याने सांगितले. मीही त्यांना पाडलंय, त्यांनीही मला पाडलंय, आता बघू काय होतंय, आज मी खूप दिवसांनी आपल्या तालुक्यात खेळतोय, त्याचा मला भरपूर आनंद आहे, असं सिकंदर म्हणाला.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा सिकंदर शेख महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र माती विभागात महेंद्र गायकवाडने उपांत्य फेरीतच सिकंदर शेखचा पराभव केला. पंचांनी फक्त फ्रंट कॅमेरा पाहिला, बॅक कॅमेरा पाहिला नाही आणि चुकीचा निर्णय दिला, असा आरोप सिकंदरने केला आहे.
दरम्यान भीमा केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सोलापूर कोल्हापूर सांगली या भागातून जवळपास ५०० पैलवान आले असून कुस्ती प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत
हेही वाचा : बालेकिल्ला शाबूत, मालेगावात भाजपला खिंडार, ठाकरेंना दादा भुसेंसमोर नवा पर्याय मिळाला