यंदाचा माघी गणेशोत्सव आज, बुधवारपासून साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने काही महत्त्वाच्या सूचना मंडळांना केल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान मंडप उभारणीच्या परवानगीसाठी प्रतिवर्षीप्रमाणे सर्वसाधारण कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येईल. मंडपाचे शुल्क पूर्णपणे माफ करण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. हे शुल्क फक्त याच वर्षासाठी माफ करण्यात आले आहे. विभाग कार्यालयामार्फत परिपत्रक निघण्यापूर्वी मंडळांना मंडपासाठी सशुल्क परवानगी दिली गेली असल्यास शुल्क परताव्याची कार्यवाही करण्याचे निर्देश २३ जानेवारीच्या परिपत्रकान्वये देण्यात आले असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
करोनाचे संकट लक्षात घेता संभाव्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जारी केल्यास, त्या परिस्थितीचे पालन केले जाईल, अशा आशयाचे हमीपत्र मंडळांकडून स्वीकारण्यात येणार आहे. पालिका व मुंबई पोलिसांद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
विभागात कृत्रिम तलाव
विभागीय सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या अधिपत्याखालील विभागात माघी गणेशोत्सवादरम्यान उभारावयाच्या कृत्रिम तलावांबाबत आवश्यक ती पडताळणी करावी. त्यानंतर आवश्यकतेनुसार आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.