Pariksha Pe Charcha: बहुतांश शाळांमध्ये थेट प्रक्षेपणाची सुविधा नाही,’परीक्षा पे चर्चा’ पाहायची कशी?

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात तणावमुक्त राहता यावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २७ जानेवारीला ‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. याचे प्रत्येक शाळेत थेट प्रक्षेपण करण्याच्या सूचना शिक्षण मंत्रालयाने दिल्या आहेत. मात्र, बहुतांश शाळांमध्ये याचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी सुविधाच नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा कार्यक्रम कसा दाखवायचा, असा प्रश्न शाळांसमोर पडला आहे.

शालेय परीक्षांना पुढील महिन्यापासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील तालकोटरा स्टेडियम येथून २७ जानेवारीला सकाळी ११ वाजता विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांशी हा संवाद साधला जाणार आहे. दूरस्थ प्रणालीद्वारे याचे थेट प्रक्षेपण केले जावे, अशा सूचना राज्याच्या शिक्षण विभागाने दिल्या आहेत. शाळेतील दूरदर्शन संच, संगणक यावरून विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम दाखविला जावा. ज्या शाळांकडे टीव्ही, संगणक उपलब्ध नाही तिथे मोबाइल अथवा रेडिओवरून कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

मात्र, राज्यातील अनेक शाळांमध्ये प्रत्येक वर्गात टीव्ही, डिजिटल स्क्रीन नाही. अनेक शाळांमध्ये एखादाच टीव्ही उपलब्ध आहे. वस्तीतील शाळांमध्ये मैदान आणि सभागृह नाही. त्यातून त्यांनी एकाचवेळी सर्व विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम कसा दाखवायचा असा प्रश्न शाळांना पडला आहे. अनुदानित शाळांची परिस्थिती याहून बिकट आहे. या शाळांना वेळेवर अनुदान मिळत नाहीत. त्यातून त्यांच्याकडे सुविधांची वानवा आहे. मात्र त्याचवेळी असे कार्यक्रम दाखविण्याचे बंधन घातले जात आहे.

सरकारने हे कार्यक्रम दाखविण्याचे बंधन करताना किमान सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी केली. तसेच अनेक शाळांमध्ये अंतर्गत परीक्षा सुरू आहेत. शाळांनी त्याचे नियोजन केले आहे. त्यातून ऐनवेळी हा कार्यक्रम ठेवल्याने या शाळांचे नियोजन बिघडणार नाही याचा विचार करणे आवश्यक होते, असेही पंड्या यांनी नमूद केले.

‘आमच्या शाळेत एकच संगणक उपलब्ध आहे. तसेच शाळेत मोठे सभागृह नाही. त्यामुळे एका वर्गखोलीत जेवढ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रम दाखविणे शक्य आहे, तेवढ्यांनाच कार्यक्रम दाखविला जाणार आहे,’ असे शिक्षक संजय डावरे यांनी सांगितले.

दुर्गम भागांत नेटवर्कची समस्या

ज्या शाळांकडे टीव्ही अथवा संगणक उपलब्ध नाही त्यांना रेडिओवर कार्यक्रम प्रक्षेपण करण्यास शिक्षण विभागाने सांगितले आहे. मात्र हा रेडिओ कोठून आणायचा असाही प्रश्न शिक्षक विचारत आहेत. तसेच दुर्गम भागांत मोबाइल फोनवर कार्यक्रमाचे प्रक्षेपण करताना इंटरनेट नेटवर्क नसल्याचे शिक्षक सांगत आहेत.

Source link

education newsEducation News in Marathihow to apply for pariksha pe charchapariksha pe charchaPariksha Pe Charcha 2023Pariksha Pe Charcha EnrollPariksha Pe Charcha EnrollmentPariksha Pe Charcha last date to applyPariksha Pe Charcha participatePariksha Pe Charcha registration date extendedPM Narendra ModiPM with Studentssteps to apply for pariksha pe charchaपंतप्रधान नरेंद्र मोदीपरीक्षा पे चर्चाशाळांमध्ये थेट प्रक्षेपण
Comments (0)
Add Comment