पुणे-नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्तात ‘पठाण’ प्रदर्शित; दीपिकाच्या भगव्या बिकिनीचा वाद अद्यापही चर्चेत

नाशिक: अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पठाण’ सिनेमा अखेर प्रदर्शित झाला असून महाराष्ट्रातील विविध शहरात या सिनेमाचा शो हाऊसफुल्ल आहेत. दरम्यान राज्यात काही ठिकाणी सिनेमागृहाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळाला. पुणे आणि नाशिकमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली.

नाशिकमध्ये काय आहे परिस्थिती?

नाशिकमध्ये पठाचे शो हाऊसफुल्ल आहेत. ‘पठाण’ पाहण्यासाठी मालेगाववरूनही शाहरुखचे चाहते नाशिकला आले आहेत. नाशिकमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तात हा चित्रपट नाशिक मध्ये प्रदर्शित करण्यात आला.

‘बेशरम रंग’ गाण्यामुळे वादात सापडलेल्या पठाणला अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध करण्यात आला होता. दरम्यान नाशिकमध्ये पठाणचा पहिला शो सकाळी सात वाजल्यापासून होता असून याठिकाणी तीन चित्रपटगृहात हा चित्रपट दाखवला जाणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी मालेगाव वरून शाहरुख खानचे चाहते आले आहेत.

देशभरात अनेक ठिकाणी चित्रपटगृहांबाहेर ‘पठाण’च्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. पठाणची पोस्टर्सही फाडण्यात आली. असा प्रकार नाशिकमध्ये घडू नये तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. नाशिक शहरातील कॉलेज रोडवर असलेल्या मल्टिप्लेक्स थिएटर बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी दहा ते बारा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत .

पुण्यातही कडक बंदोबस्तात सिनेमा प्रदर्शित

पुण्यातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. पुण्यातील जवळपास सर्व चित्रपटगृहांबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. देशभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाऊ नये अशी मागणी बजरंग दल तसच इतर काही हिंदूत्ववादी संघटनांकडून करण्यात आली होती, परिणामी पोलिसांकडून असा बंदोबस्त करण्यात आला आहे.

२५ जानेवारी रोजी रीलिज झालेल्या पठाण सिनेमात शाहरुखसह दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत. दरम्यान या सिनेमात सलमान खानचा कॅमिओ पाहून चाहत्यांनाही मोठं सरप्राइज मिळालं. शिवाय थिएटरमध्ये पठाण सिनेमा सुरू होण्यापूर्वी सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चा टीझरही दाखवण्यात आला होता. त्यामुळे आजचा दिवस केवळ शाहरुखच्याच चाहत्यांसाठी नव्हे तर सलमानच्या चाहत्यांसाठीही खास ठरला.

Source link

pathaan moviepathaan movie controversypathaan movie releasePathaan Release in Pune and Nashikपठाण सिनेमा प्रदर्शित
Comments (0)
Add Comment