कोणत्याही मंडळाशी संलग्न शाळा सुरू करताना संबंधित शिक्षण संस्थेला त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करून त्या मंडळाची मान्यता प्राप्त करणे बंधनकारक असते. त्यानंतरच ती शाळा सुरू करता येते. मात्र, गेल्या काही वर्षांत मंडळांच्या मान्यतेविनाच शाळा सुरू करून पालकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अनेक तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्यामुळे आयुक्त सूरज मांढरे यांच्या आदेशानुसार, राज्यभरातील अनधिकृत सीबीएसई शाळांची तपासणी करण्यात येत आहे. नाशिक महापालिका शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील पाच सीबीएसई शाळा मान्यतेविना सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित शाळांना तातडीने या शाळा बंद करण्याबाबत नोटीस दिली जाणार असून, नोटीस मिळाल्यानंतर आठ दिवसांत शाळा बंद न केल्यास ‘आरटीई’नुसार या शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.
राज्यातील काही शहरांमध्ये मान्यतेविना शाळा सुरू असल्याची माहिती पुढे आल्यानंतर राज्यभरातील अशा अनधिकृत शाळा शोधण्याचा आदेश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिला होता. त्यानुसार सीबीएसई बोर्डाशी संलग्न पाच शाळा अनधिकृत असल्याची, तर १९ शाळांना सीबीएसई बोर्डाची मान्यता असल्याचे माहिती पुढे आली आहे. या अनधिकृत शाळांना नोटीस देऊन याबाबतचा अहवाल लवकरच वरिष्ठ कार्यालयाला पाठविला जाणार आहे.
या शाळा अनधिकृत
– बिर्ला ओपन माइंड इंटरनॅशनल स्कूल, नाशिकरोड
– विबग्योर इंटरनॅशनल स्कूल, पंचवटी, नाशिक
– एक्सेल पब्लिक स्कूल, पंचवटी, नाशिक
– एमराल्ड हाइट्स, नाशिकरोड
– गोल्डन डेज इंग्लिश मीडियम स्कूल, औरंगाबाद रोड, नाशिक
या सर्व शाळा नाशिक महापालिका क्षेत्रातील असून, लवकरच त्यांना नोटीस पाठवली जाणार आहे. कोणत्याही मंडळाशी संलग्न शाळा सुरू करताना त्या मंडळाचे नियम पाळणे, सरकारची मान्यता, इरादापत्र प्राप्त झाल्यानंतर शाळा सुरू करणे यासह काही आवश्यक बाबींची पूर्तता करणे गरजेचे असते. मात्र, कोणत्याही मान्यतेविना पाच शाळा सुरू असल्याचे आढळून आल्या असून, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
– डॉ. सुनीता धनगर, प्रशासनाधिकारी, महापालिका शिक्षण विभाग