पुस्तकी शिक्षण नको
शिक्षण घेतल्याशिवाय नोकरी मिळणार नाही. पण या शिक्षण पद्धतीत काळानुसार बदल अपेक्षित आहेत. त्यामुळेच आपलं शिक्षण नोकरी देतं का हा मोठा प्रश्नंच आहे. पुस्तकी शिक्षण घ्यायचं की प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षण घ्यायचं हे नोकरीच्या क्षेत्रानुसार ठरलं पाहिजे. पण तसं होताना दिसत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
नोकरीची नकारघंटाच
आजच्या शिक्षण पद्धतीतले काही मोजकेच कोर्स नोकरीसाठी उपयुक्त ठरतात. उदा. बीएमएस. विशेषतः देशात किंवा परदेशात नोकरी मिळवण्यासाठी अशा कोर्सचा उपयोग होऊ शकतो. पण सर्व शिक्षणपद्धतीचा विचार केला तर ती नोकरी देणारी ठरते का? हा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करतात.
आऊटडेटेड अभ्यासक्रम बदला
काही शाखांमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम ‘आऊटडेटेड’ आहे. दहावी, बारावीसोबत आता पदवी शिक्षणाकडेही केवळ उच्च शिक्षणासाठी लागणारी अनिवार्य अर्हता म्हणून पहिलं जातं. पदवी असली तरीही नोकरी मिळत नाही. मग त्याचा काय उपयोग? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो.
व्यक्तिमत्त्व विकास हवा
हो. शिक्षण पद्धतींमध्ये अनेक बदल होताना दिसतायत. त्यातील प्रात्यक्षिकांचाही भाग वाढतोय. कॉर्पोरेट क्षेत्रात स्वतःचं स्थान पक्कं करण्यासाठी जगाची ओळख असणं गरजेचं असतं. काही अभ्यासक्रमांतून हे सगळं मिळतंय. पण तरीही लेखी संकल्पनात अडकण्यापेक्षा व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यायला हवा अशी सूचना विद्यार्थ्यांकडून होतेय.
नोकरी नाहीच
सध्याची शिक्षण पद्धती नोकरीच्या दृष्टीने उपयुक्त नाही. मी कॉमर्सला आहे. पण मला नोकरी करण्यासाठी आवश्यक माहिती तिथे नाहीच मिळत. याऊलट अनेक संदर्भहीन विषय आम्हाला शिकवले जातात असं वाटतं. महाराष्ट्रात शालेय पातळीवरच्या अभ्यासक्रमांचा दर्जाही तितकासा चांगला नसल्याचे निरीक्षण विद्यार्थ्यांने नोंदविले आहे.