आयआयटी, एनआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी परीक्षेत ७५ टक्के गुणांची अट घालण्यात आली आहे. सीबीएसई बोर्डातून गेल्यावर्षी उत्तीर्ण होऊन आयआयटी आणि एनआयटीतील प्रवेशासाठी एक वर्ष अवकाश घेतलेल्या विद्यार्थ्यांना याची झळ बसत आहे. त्यामुळे गेल्यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही अट एका वर्षासाठी शिथिल करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. त्याबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र देण्यात आले आहे.
आयआयटी, एनआयटी या प्रतिष्ठित संस्थांतून उच्च शिक्षण घेण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्यासाठी देशपातळीवर मोठी स्पर्धा असते. करोनापूर्वी आयआयटी आणि एनआयटीतील प्रवेशासाठी बारावीमध्ये ७५ टक्के गुण मिळवण्याची अट होती. मात्र, करोनाकाळात विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत जाऊ न शकल्याने ही अट शिथिल करण्यात आली होती. यातच गेल्या वर्षी सीबीएसई बोर्डाने दोन सत्र परीक्षांच्या गुणांच्या आधारे बारावीचा निकाल जाहीर केला. यासाठी ३० आणि ७० टक्क्यांचा पॅटर्न लागू करण्यात आला. मात्र त्यातून अनेक मुलांना एका सत्रात कमी गुण मिळाल्याने त्यांची एकत्रित गुणांची बेरीच ७५ टक्क्यांपेक्षा कमी झाली, असे पालकांचे म्हणणे आहे.
सीबीएसई बोर्डाने यंदा हा पॅटर्न रद्द केला. मात्र गेल्या वर्षी आयआयटी आणि एनआयटी प्रवेशासाठी ७५ टक्क्यांची अट नव्हती. त्यातून पुढेही ही अट लागू राहणार नाही, या आशेवर अनेक विद्यार्थ्यांनी आयआयटीच्या प्रवेशासाठी जेईई मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी शिक्षणातून एक वर्षाचा अवकाश घेतला. मात्र आता पुन्हा आयआयटी आणि एनआयटी प्रवेशासाठी ७५ टक्के गुणांची अट लागू करण्यात आली आहे. परिणामी एक वर्ष अवकाश घेऊन जेईई मुख्य परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे ही अट रद्द करावी या मागणीचे पत्र पालकांनी प्रधान यांना लिहिले आहे.
… तर शैक्षणिक नुकसान टळेल
‘या विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षेत उत्तम गुण मिळविले तरी केवळ ७५ टक्के गुण नाहीत म्हणून त्यांना प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे सरकारने एका वर्षासाठी ७५ टक्के गुणांची ही अट शिथिल करावी, अथवा २०२२ मधील बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेच्या प्रथम सत्रातील परीक्षेत ३० टक्के गुण आणि द्वितीय सत्रातील परीक्षेत ७० टक्के गुण या पॅटर्नऐवजी प्रथम सत्रातील ७० टक्के गुण आणि द्वितीय सत्रातील ३० टक्के गुण हा पॅटर्न लागू करावा. याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ होईल. तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,’ असे इंडियावाइड पॅरेंट असोसिएशनच्या अध्यक्षा अनुभा श्रीवास्तव-सहाय यांनी म्हटले आहे.