VIP पासेसना पायबंद
या निर्णयानुसार आजी-माजी मंत्री, आमदार, विश्वस्तांना आता आपल्या पीएंच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र साई संस्थानला द्यावे लागणार आहे. शिवाय दोन दिवस अगोदर शिफारस करणाऱ्यालाच व्हीआयपी पास देण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. त्यामुळे आर्थिक संबंधातून विकल्या जाणाऱ्या व्हीआयपी पासेसना पायबंद बसणार आहे.
सुविधेचा गैरफायदा घेतला, संस्थानाने जालीम उपाय शोधला
शिर्डीत भाविकांची नेहमीच गर्दी असते. अशावेळी लवकर आणि सुलभ दर्शन व्हावे, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. संस्थानतर्फे अलीकडेच पेड पासची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, व्हीआयपींकडून आलेल्या पाहुण्यांना मोफत दर्शन पास देण्याची जुनीच व्यवस्था आहे. त्यानुसार आजी माजी मंत्री, आमदार, खासदार आणि विश्वस्तांचे पाहुणे म्हणून शिर्डीत साई समाधी मंदिरात व्हीआयपी पास मिळवून दर्शनचा सुविधा आहे. त्यांच्या कार्यालयाकडून पत्र घेऊन आलेल्यांच्या दर्शनाची सोय केली जाते. नेमका याच सुविधेचा अनेकांनी गैरफायदा घेण्यास सुरवात केली आहे. या सुविधेचा लाभ मिळवून देणारी टोळीच मंदिर परिसरात कार्यरत झाली आहे. भाविकांकडून पैसे घेऊन त्यांना हे पास दिले जात आहेत. लोकप्रतिनिधींचे पीए असल्याचे सांगत अनेक एजंट असा धंदा करीत असल्याचे आढळून येते.
आता गैरप्रकारांना आळा बसेल!
याला आळा घालण्यासाठी प्रभारी सीईओ जाधव यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकप्रतिनिधींची सुविधा बंद होणार नाही, तर त्याआडून होणारे गैरप्रकार थांबणार आहेत. त्यासाठी लोकप्रतिनिंधींना साईबाबा संस्थानला पत्र पाठवून असे पास देण्यासाठी आपल्या कार्यालयाकडून कोणत्या सहायकाची नियुक्ती केली आहे, याची माहिती द्यावी लागणार आहे. त्यांच्याकडून आलेली पत्रेच यासाठी ग्राह्य धरणार येणार आहेत. भाविकांच्या दर्शनाची शिफारस करणारी पत्रे दर्शन हवे असलेल्या दोन दिवस आधीची असली पाहिजे, असेही सांगण्यात आले आहे. यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे.