नगर मनमाड रोडवर असलेल्या छोट्या खानी हात गाडीवर बाळूबाई गायकवाड यांनी ‘आजीचा चहा’ नावाने चहाचं हे दुकान सुरू केलं आहे. हा चहा आजी स्वतः बनवतात. त्यांच्या या कामात त्यांचा नातू मात्र सावलीसारखा त्यांच्या पाठीशी उभा असतो. या आजींना दोन मुलं असून त्यांचा धाकटा मुलगा रिक्षा चालवतो. मात्र महागाईच्या काळात त्याच्या पगारावर घर खर्च भागत नसल्याने मुलाच्या प्रपंचाला हातभार लावण्यासाठी आजींनी स्वतःचं पुढाकार घेत एक छोटासा व्यवसाय चालू करण्याचं ठरवलं आणि त्यातूनच या आजीच्या चहाचा उदय झाला.
आज या आजींचे वय ६७ वर्ष असून या वयातही त्या आपल्या मुलासाठी आणि त्याच्या संसारासाठी दिवसभर चहाच्या स्टॉलवर उभं राहून काम करतात. एकीकडे आजच्या तरुण पिढीला स्वतःसाठी काम करायचा कंटाळा येत असताना दुसरीकडे या आजी वयाच्या ६७ व्या वर्षी दिवसभर न थकता आजच्या तरुणाईलाही लाजवेल इतके कष्ट करतात. लेकाच्या प्रपंचासाठी एवढा खटाटोप हे फक्त एक आईच करू शकते हेच या आजीच्या कष्टाकडे पाहून पाहायला मिळतं.