केंद्र सरकारनं आज पद्म पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये एक पद्मविभूषण तर २५ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. ओआरएसचे निर्माता दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. तर महाराष्ट्रातून एक नाव या यादीत आहे, ते म्हणजे परशुराम खोणे. परशुराम खोणे हे झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार असून त्यांनी आतापर्यंत ५००० हून अधिक नाटकांत ८००पेक्षा जास्त भूमिका साकारल्यात.
झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे (Parshuram Khune) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलतना त्यांनी हा पुरस्कार झाडीपट्टीच्या रसिकांना अर्पण केला आहे.
कोण आहेत परशुराम कोमाजी खुणे?
परशुराम कोमाजी खुणे हे गडचिरोली येथील लोकप्रिय झाडीपट्टी रंगभूमी कलाकार आहेत. त्यांना व’विदर्भाचा दादा कोंडके’ म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. गेली ५० वर्षे त्यांनी त्यांच्या कलेनं रंगभूमीची सेवा केली आहे. या सेवेचं फळ आता मिळाल्याचंही त्यांनी मुलाखतीस म्हटलंय.
गाजलेल्या भूमिका
परशुराम खुणे यांच्या ‘संगीत एकच प्याला’ नाटकातील तळीराम, तसंच ‘सिंहाचा छावा’ मधील शंखनाद, ‘संगीत लग्नाची बेडी’तील अवधूत, या भूमिका गाजल्या. तसंच ‘लावणी भुलली अभंगाला’मधील गणपा अशा भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
पद्म पुरस्कारांमध्ये मुख्यत्वे पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी असलेल्या पुरस्कारांचा समावेश आहे. १९५४ पासून सुरू झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी केली जाते. अतिशय उत्तम कार्य केलेल्यांचा सन्मान करण्याचा या पुरस्कारांचा उद्देश आहे. कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यकशास्त्र, सामाजिक कार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय आणि असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार देण्यात येतात. समुदाय, व्यवसाय, पत किंवा लिंग याबाबत कोणताही भेदभाव न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र ठरतात.