कलेचा सन्मान! सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण तर झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण जाहीर

दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून या मानकऱ्यांमध्ये कला क्षेत्रातील दिग्गजांच्या नावाचाही समावेश आहे. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर तबलावादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं आहे.

सुमनशैली
१९५४पासून तीन दशकांचा काळ सुमन कल्याणपूर यांनी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आपल्या स्निग्ध, नितळ गळ्यानं व मधुर शैलीनं गाजवला आहे. १३ भारतीय भाषांमध्ये ३५०० गीतं गाताना, त्यांनी स्वतःचं कोमल आत्मभान जागृत ठेवलं. आवाजाचा तरल पोत, विलक्षण लगाव, कुठल्याही सप्तकात पोहोचताना कुठंही तीक्ष्ण न होणारा स्वर यांतून निर्माण झालेली गायकी म्हणजे सुमनशैली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

‘बुझा दिये हैं खुद अपने हाथों’, ‘ठहरिये होश में आ लूँ’, ‘मेरे संग गा गुनगुना’, ‘न तुम हमे जानो’, ‘मेरे मेहबूब न जा’, ‘दिल एक मंदिर है’, ‘आयी वो बहारें’, ‘शराबी शराबी ये सावन का मौसम’, ‘ना ना करते प्यार तुम्हीं से’, ‘आज कल तेरे मेरे प्यारके चर्चे’, ‘मेरा प्यार भी तू है’, ‘जूही की कली मेरी लाडली’, अशा अनेक गाण्यांना त्यांनी आवाज दिलाय.

‘वाह उस्ताद’

‘वाह उस्ताद’ हे शब्द कानी पडताच प्रत्येक संगीत प्रेमींच्या डोळ्यासमोर एकाच व्यक्तीचा चेहरा येतो ते म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन! तबल्यावर त्यांचे हात अशा प्रकारे चालतात की कानांना जणू स्वर्गीय सुख प्राप्त होतं, अश्या प्रतिक्रिया रसिकांकडून येतात. लोकं अक्षरश: मंत्रमुग्ध होतात.

आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पश्चिम बंगालच्या डॉ. दिलीप महालानबीस यांना ओआरएसच्या शोधाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

Source link

padma awards 2023Padma Awards 2023 announcedpadma awards 2023 listsuman kalyanpurzakir hussainzakir hussain awardपद्म पुरस्कारपद्म पुरस्कारांची घोषणा
Comments (0)
Add Comment