पदवीधर मतदारसंघातील राजकीय घडामोडींनतर जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी तांबे यांना पाठिंबा देण्यासंबंधीचे मत स्थानिक वृत्तपत्रांतून व्यक्त केले होते. त्या बातमीच्या आधारे प्रदेश कार्यालयाने साळुंखे यांना नोटीस पाठवून दोन दिवसांत खुलासा करण्यास सांगितले होते. मात्र, साळुंखे यांनी खुलासा तर केला नाहीच, उलट आपला राजीनामा पाठवून दिला आहे. त्यामुळे ते आता तांबे यांच्या प्रचारात सक्रीय होण्याची शक्यता आहे.
तांबे यांच्या उमेदवारीवरून नगर जिल्ह्यात काँग्रेसमध्येच दोन गट पडल्याचे पहायला मिळते. एका मोठ्या गटाचा तांबे यांना पाठिंबा आहे. एवढेच नव्हे तर अनेक कार्यकर्ते आतून कामही करीत आहेत. तर काहींनी उघड विरोध व्यक्त करीत प्रदेश काँग्रेसच्या भूमिकासोबत ठाम राहणार असल्याचे सांगितले आहे. साळुंखे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे समर्थक मानले जातात. त्यांनी मात्र, पदावर असताना आणि अगदी सुरवातीलाच तांबे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती.
आता राजीनाम्यासंबंधी बोलताना ते म्हणाले, “कित्येक वर्षे निष्ठापूर्वक काम करणाऱ्या तांबे कुटुंबीयांवर काँग्रेसने अन्याय केला आहे, अशी आमची भावना आहे. अशा परिस्थितीत तांबे यांच्या पाठिशी राहणे आवश्यक आहे. त्यामुळे मी तशी भूमिका व्यक्त केली होती. मात्र, पक्षांतर करून आलेल्या अनेकांची पक्षात चलती आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून, पूर्ण माहिती न घेता, परिस्थितीचे आकलन न करता निष्ठावन मंडळींवर बाहेरून आलेले कारवाई करीत असतील तर ते चुकीचे आहे. त्यामुळे याचा निषेध करीत मी प्रदेशाध्यक्षांकडे पोस्टाने राजीनामा पाठविला आहे,” असे साळुंखे यांनी सांगितले.
तांबे यांच्यासाठी आतून काम करणारे तसेच ठोस विरोध करणारेही पदाधिकारी-कार्यकर्तेही आहेत. मात्र, त्यांच्यासाठी पदाचा राजीनामा देणारे साळुंखे पहिलेच ठरले आहेत.