मुंबई दहशतवाद्यांच्या नेहमीच लक्ष्यस्थानी असते. त्यामुळे सण-सोहळे, राष्ट्रीय दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या वतीने नियमितपणे ‘ऑपरेशन ऑलआउट’ हाती घेतले जाते. या कालावधीत सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे ऑनड्युटी असतात. त्यानुसार मंगळवारी पोलिसांच्या पथकांनी मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतून ५१ फरारी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अजामीनपात्र वॉरंट बजावलेल्या १०० जणांना अटक करण्यात आली. ड्रग्जबाबतच्या कारवायांवरही पोलिसांनी विशेष भर देत ड्रग्ज सेवन, विक्री, तस्करी करणाऱ्यांवर १३९ ठिकाणी कारवाई केली. बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाईसाठी ४१ ठिकाणी छापे टाकण्यात आले. दारू आणि जुगाराच्या ७० अवैध धंद्यांवर छापे टाकून ५५ जणांची धरपकड करण्यात आली.
मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याअनुषंगाने ३३१ अनधिकृत फेरीवाल्यांना हटवितानाच ११४ ठिकाणी महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये संशयितरित्या वावरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मुंबईतून तडीपार करण्यात आले असतानाही विना परवानगी मुंबईत खुलेआम फिरणाऱ्या ४२ जणांना पकडण्यात आले. पोलिसांनी २०२ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील ३३१ आरोपींवर गुन्ह्यांनुसार प्रतिबंधक कारवाई केली. ८४४ हॉटेल, लॉजेस, मुसाफिरखाने यांची प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली.
सात हजार वाहनांची तपासणी
मुंबईत १११ ठिकाणी नाकाबंदी लावून पोलिसांनी ७,४०६ दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तपासणी केली. यामध्ये मोटार वाहन कायद्यान्वये २,५६८ चालकांवर कारवाई करण्यात आली; तर मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या पाच चालकांना पकडण्यात आले.