शाहरुख, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर ‘पठाण’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहे. यानंतर बॉलिवूड बिझनेस एक्सपर्ट्सच्या मते पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा २०० कोटींची जबरदस्त कमाई करेल. हा सिनेमा शुक्रवारऐवजी बुधवारी रीलिज झाल्याने पहिल्या वीकेंडपर्यंत एकूण ५ दिवस मिळत आहेत. याशिवाय २६ जानेवारी रोजी गुरुवारी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने त्याचा फायदाही पठाणला होईल. त्यामुळे या पाच दिवसातच पठाण २०० कोटी कमावेल असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतायंत. शिवाय अशीही शक्यता वर्तवण्यात येतेय की वर्ल्डवाइड ‘पठाण’ची कमाई वीकेंडपर्यंत ३०० कोटींची होऊ शकते.
काय म्हणाले बिझनेस एक्सपर्ट्स?
फिल्म बिझनेसविषयी जाणकार असणारे तरण ट्रेड अनालिस्ट तरण आदर्श, डिस्ट्रिब्युटर अभिमन्यू बन्सल, अक्षय राठी आणि रुबन माठीवनन यांनी ‘पठाण’च्या कमाईबाबत ईटाइम्सशी बातचीत केली. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
अक्षय यांचा असा अंदाज होता की पठाण पहिल्या दिवशी ३५ कोटींची कमाई करेल, तर आदर्श, बन्सल आणि रुबन यांचाही असा अंदाज होता की पठाणची पहिल्या दिवसाची कमाई ४० कोटींची असेल. मात्र या सर्वांचे अंदाज फोल ठरवत पठाणने पहिल्याच दिवशी ५१ कोटींचा गल्ला जमवला आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला. शाहरुखचा ‘पठाण’ सिनेमा आणि त्यातील ‘बेशरम रंग’ हे गाणं यावरुन वाद होऊनही या सिनेमाने एवढी जबरदस्त कमाई का केली असावी, याबाबतही या चारही तज्ज्ञांनी भाष्य केले.
सकाळी ७ वाजता मल्टिप्लेक्समध्ये तुफान गर्दी
आदर्श यांनी असेही म्हटले की, हिंदी सिनेविश्वात दीर्घकाळापासून एवढा उत्साह पाहायला मिळाला नव्हता. त्यांनी असे म्हटले की, ‘असा उत्साह केजीएफ २ च्या वेळी पाहायला मिळाला होता, जेव्हा सर्व सिनेप्रेमी खूपच उत्साहित होते. हिंदी सिनेमाच्या बाबतीत असा अनुभव मिळण्याला अनेक वर्ष लोटली आहेत. मी सकाळी ७ वाजता मुंबईतील लोखंडवाला याठिकाणी असणाऱ्या मल्टिप्लेक्समध्ये होते आणि माझा विश्वास बसत नव्हता मल्टिप्लेक्स पूर्णपणे भरलेले होते. लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या, शाहरुख आणि सलमान खानच्या एन्ट्रीचे लोक कौतुक करत होते.’
२०२३ ची धमाकेदार सुरुवात
ते पुढे असं म्हणाले की, ‘मोठ्या पडद्याची जादू कधीच फेल होऊ शकत नाही आणि सिनेमा पाहायला जाणाऱ्यांसाठी मोठा पडदा नेहमीच त्यांची पहिली निवड असेल. जर लोक सकाळी ६ आणि ७ वाजता पठाणची वाट पाहू शकतात तर हेच सिद्ध होतं की बड्या पडद्याची जादू कायम राहील.’ २०२३ ची धमाकेदार सुरुवात असल्याचंही ते म्हणाले.
तर दुसरीकडे रुबन असे म्हणाले की, दाक्षिणात्य चित्रपट केजीएफ, कांताराला मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करण्यात आलं, मात्र आता एका योग्य हिंदी सिनेमाच्या प्रतीक्षेत होतो आणि मला वाटते हा सिनेमा तोच आहे!