या शूटरच्या शोधासाठी नांदेड पोलिसांची पथके अनेक राज्यांत जाऊन आली होती. आता शूटरच्या अटकेमुळे बियाणी यांच्या हत्येसह इतर घटनांतील अनेक बाबी समोर येणार आहेत. बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची खंडणीच्या कारणावरून हरविंदरसिंह रिंदा याच्या साथीदाराने गोळ्या घालून हत्या केली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बियाणींच्या घरी भेट देऊन आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले होते.
आरोपीवर विविध राज्यांमध्ये २५ गुन्हे
एनआयएने पकडलेल्या दीपक सुरेश रांगा या आरोपीच्या विरोधात देशभरातील विविध राज्यांमध्ये २५ गुन्हे दाखल आहेत. त्यात हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांचा समावेश असून आता महाराष्ट्रातही गुन्हा नोंद झाला आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे एसआयटीच्या पथकासह मागील काही दिवसांपासून परराज्यात तळ ठोकून होते. संजय बियाणी खून प्रकरणातील शूटर पकडला गेल्याने खुनाच्या कटात नेमके कोण-कोण सहभागी आहेत? याचा धागा पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे. तसंच प्रकरणातील आरोपींची संख्याही वाढू शकते.
दरम्यान, एका महिन्यापूर्वी गुजरातमधून एका शूटरला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या दीपक सुरेश रांगा हा यंत्रणांना गुंगारा देत होता. दुसरीकडे रिंदाच्या दहशतीमुळे नांदेड शहरातील अनेक मोठे व्यावसायिक नांदेड शहर सोडून जात होते. बियाणी यांच्या हत्येतील शार्पशूटरला अटक करण्यात आल्याने या प्रकरणातील अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.