ठाण्यात उद्धव ठाकरे बरसले; मोजक्याच शब्दांत एकनाथ शिंदेंचा खरपूस समाचार, मोठी घोषणाही केली!

ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्याकडून शहरात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराला आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. तसंच लवकरच आपण ठाण्यात भव्य सभा घेणार असल्याची घोषणाही उद्धव यांनी केली आहे.

‘सध्या राजकारणात विकृत आणि गलिच्छपणा सुरू असतानाही शिवसेना मात्र आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही, याचा मला अभिमान आहे. अन्यायावर लाथ मारा, हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहेच. पण त्यासोबतच ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण हे आपल्याला शिवसेनाप्रमुखांनी शिकवलं आहे. अस्सल आणि निष्ठावंत शिवसैनिक या व्यासपीठावर आहेत आणि बाकीचे जे विकाऊ होते ते विकले गेले. काय भावाने विकले गेले ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, मी ते सांगण्याची गरज नाही,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

जळगावातील प्रचार मेळाव्यात पाहा झालं तरी काय? भाजपच्या पाठींब्यावर सत्यजित तांबे म्हणाले…

गेले ते जाऊद्या, पण जे अस्सल आणि निखाऱ्यासारखे शिवसैनिक माझ्यासोबत राहिले आहेत, तेच उद्या राजकारणात मशाल पेटवणार आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपण नव्या पक्षचिन्हासह लढण्यास तयार असल्याचं आपल्या राजकीय विरोधकांना सांगितलं आहे.

दरम्यान, ‘संजय राऊत आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काश्मीरला गेले होते. तिथेही ५० खोके एकदम ओके ही घोषणा पोहोचली आहे. देशभरात सगळीकडे या घोषणेची चर्चा झाली. महाराष्ट्रात निष्ठेच्या पांघरूणाखाली जे लांडगे घुसले होते, ते विकले गेले. त्यातून महाराष्ट्राची आणि शिवसेनेचीही बदनामी झाली आहे,’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, ठाण्यातील आरोग्य शिबिराला सुरुवात करताना उद्धव ठाकरे यांनी आपला मुख्यमंत्रिपदी असतानाचा अनुभवही सांगितला. ‘आज मी जास्त राजकीय बोलणार नाही. मात्र मी मुख्यमंत्री असताना जगावरच एक विचित्र संकट आलं होतं. त्या संकटात कारभार करणं कठीण होतं. मात्र तुम्ही सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं. त्या काळात सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे आपण बंद केली होती. तेव्हा काही जण मला विचारायचे की आम्हाला मंदिरात आणि आमच्या प्रार्थनास्थळांमध्ये का जाऊ दिलं जात नाही. त्यावर मी सांगायचो की जो देव आपल्याला मंदिरात भेटतो, तोच देव आताच्या स्थितीत डॉक्टर आणि नर्सच्या रुपात आपले प्राण वाचवायला आला आहे,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Source link

CM Eknath Shinderajan vichareshivsena uddhav thackeraythane news updatesउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेठाणे ताज्या बातम्याराजन विचारे
Comments (0)
Add Comment