वसंत पंचमीचा मुहूर्त साधत आज सकाळीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट तिरुमला येथे पोहोचले. सकाळी १० वाजताच्या सुमारास अनंत आणि राधिका यांनी मंदिरात प्रवेश केला. अनंत पांढरं शुभ्र धोतर आणि सदऱ्यात तर राधिकाने सलवार-कुर्ता परिधान केला होता. त्यांच्या सोबतीला अंबानी कुटुंबाचे काही स्नेही होते. तसेच मंदिर देवस्थानाचे विश्वस्त देखील होते.
साखरपुडा झाल्यानंतर अनंत आणि राधिका पहिल्यांदाच एकत्रितरित्या दिसून आले. आज सकाळी तिरुपती बालाजीची मनोभावे पूजाअर्चा करुन त्यांनी दर्शन घेतलं. अनंत आणि राधिका काही दिवसांतच वैवाहिक आयुष्याची सुरुवात करतील. नव्या इनिंगला सुरुवात करण्यापूर्वीच त्यांनी बालाजीचरणी माथा टेकवला, तिरुपतीचे आशीर्वाद घेतले.
साखरपुडा सोहळ्याची सुरुवात गुरुवारी संध्याकाळी झाली. तत्पूर्वी, अंबानी कुटुंबातील सदस्यांनी अनंत यांची बहीण ईशा यांच्या नेतृत्वात मर्चंट यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आणि राधिकाला साखरपुडा सोहळ्यासाठी आमंत्रण दिले. या आमंत्रणाचा स्वीकार करून मर्चंट कुटुंबीय अंबानी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. अंबानी कुटुंबीयांनी आरती आणि मंत्रोच्चारात मर्चंट कुटुंबाचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर दोन्ही कुटुंबे अनंत आणि राधिका यांच्यासोबत भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात गेली. त्यानंतर समारंभस्थळी गणेश पूजन करण्यात आले आणि पारंपरिक पद्धतीने लग्नपत्रिकेचे वाचन करण्यात आले.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा १९ जानेवारी रोजी अँटिलियामध्ये शाही साखरपुडा झाला. या साखरपुड्याला बॉलिवूडमधील बहुतांश कलाकार मंडळी उपस्थित होते. ऐश्वर्या राय- बच्चन तिची मुलगी आराध्यासोबत सहभागी झाली होती. सलमान खान आणि शाहरुख खान, दीपिका-रणवीर, जान्हवी कपूर देखील या कार्यक्रमाला गेले होते. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील साखरपुड्याला हजेरी लावली होती.