नाना पटोलेंचा थोरातांना मोठा धक्का, अहमदनगर जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त

अहमदनगर :सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये सुरू झालेले भूकंपाचे धक्के अद्याप सुरूच आहेत. तांबे यांना पाठिंबा दर्शविल्याने अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश उर्फ बाळासाहेब साळुंखे यांना निलंबित केल्यानंतर आता संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात पक्षात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचे वर्चस्व आहे. अध्यक्षासह अनेक पदाधिकारी त्यांचेच समर्थक आहेत. त्यामुळे ही कार्यकारिणी बरखास्त करून पटोले यांनी थेट थोरात यांनाच धक्का दिल्याचे मानले जात आहे. असे असले तरी आता या थोरात समर्थकांना उलट मोकळे रान प्राप्त झाल्याचे मानले जात आहे.

तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर काँग्रेसने आमदार डॉ. सुधीर तांबे आणि नंतर सत्यजीत तांबे यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली. मात्र, त्यानंतरही पक्षाच्याच अनेकांनी तांबे यांना पाठिंबा दिल्याने प्रदेश काँग्रेसकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सध्याच्या परिस्थितीत प्रचारापेक्षा अशी कारवाई करण्याचेच काम काँग्रेसला लागले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

तांबे यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राज्य उपाध्यक्ष नितीन शिवशरण यांनी राजीनामा दिला. तर अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी वृत्तपत्रांतून तांबे यांना पाठिंब्याची भूमिका मांडली. त्यामुळे पक्षाने त्यांना नोटीस धाडली. त्या नोटीशीला उत्तर न देता साळुंखे यांनी आपला राजीनामाच सादर केला.

तर दुसरीकडे ज्या तारखेला साळुंखेचा राजीनामा आला त्याच तारखेने त्यांना पक्षातून निलंबित केल्याचे पत्रही आले. त्यामुळे राजीनामा आधी आला की निलंबनाची कारवाई? असा प्रश्न पडला असतानाच प्रदेश काँग्रेसकडून आणखी एक कारवाईचे पक्ष आले.

या पत्रानुसार आता अहमदनगर जिल्ह्याची पक्षाची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याचा आदेश काढला आहे. अध्यक्ष निलंबित आणि कार्यकारिणी बरखास्त अशी स्थिती झाल्याने ऐन निवडणुकीत जिल्ह्यात पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. जिल्हा कार्यकारिणीत थोरात समर्थकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आता ही मंडळी तांबे यांच्या प्रचारात सक्रीय होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा : साखरपुडयानंतर राधिका मर्चंट-अनंत अंबानी तिरुमालाला, भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनाला

अहमदनगर जिल्ह्यातील पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख हे प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या सांगण्यावरून जिल्ह्यातील निर्णय घेतले जात असल्याचे पक्षात बोलले जाते. या सर्व घडामोडींवर देशमुख म्हणाले, ‘तांबे यांच्या बाबतीत पक्षाने आपली भूमिका आधीच स्पष्टपणे जाहीर केली आहे. पक्षाची शिस्त सर्वांना पाळणे आवश्यक आहे. संपूर्ण परिस्थितीवर पक्षाचे लक्ष आहे. त्यामुळे यापुढेही कोणी पक्षशिस्त मोडताना आढळून आले तर कारवाई होणारच. एवढेच नाही तर आगामी काही काळात अनेक धक्कादायक कारवाया झाल्याचे पहायला मिळेल’, असेही देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा : नाशकात भाजपचा पाठिंबा आम्हालाच, संभाजीराजेंच्या ‘स्वराज्य संघटने’च्या उमेदवाराचा दावा

Source link

ahmednagar congress committeeBalasaheb ThoratMaharashtra Political NewsNana Patolenashik graduate constituency electionsatyajeet tambeअहमदनगर काँग्रेस कार्यकारिणीनाना पटोलेबाळासाहेब थोरातसत्यजीत तांबे
Comments (0)
Add Comment