यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची संकल्पना महिला शक्ती अशी होती. त्या संकल्पनेला मिळतीजुळती संकल्पना महाराष्ट्राच्या चित्ररथावर साकारली होती. कर्तव्य पथावर राज्यातर्फे सादर झालेल्या चित्ररथावर कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी,माहूरची रेणुका ही तीन पूर्ण पीठं आणि वणीची सप्तश्रृंगी हे अर्ध अशा साडेतीन शक्तीपीठांचा देखावा साकारला होता.
हे वाचा-बॉलिवूडला ‘पठाण’ची होती गरज! या कारणांमुळे शाहरुखच्या सिनेमाचं होतंय कौतुक
चित्ररथाच्या पुढील दर्शनीय भागात गोंधळी संबळ वाद्य वाजवित असल्याची मोठी प्रतिकृती होती. समोरच्या बाजूला तसंच उजव्या आणि डाव्या बाजूला पारंपरिक वाद्य वाजविणारे आराधी, गोंधळी यांच्या प्रतिमा होत्या. त्यामागे शक्तिपीठांची मंदिरे असून त्यात देवींच्या प्रतिमा दिसत होत्या.चित्ररथाच्या मागच्या बाजूस पोतराज आणि हलगी वाजविणाऱ्या भक्तांची मोठी प्रतिकृती आहे. तर मधल्या जागेत लोककलाकार आराधी, पोतराज हे लोककला सादर करताना दिसत होत्या. तर शेवटी मागच्या बाजूस नारी शक्तीचं प्रतिनिधीत्व करणारी एक मोठी स्त्रीप्रतिमा दिसत होती.
चित्ररथावर साकरलेल्या साडेतीन शक्तीपीठांची महती सांगणारे गीत वाजवले जात होते. हे गीत प्राची गडकरी यांनी लिहिलं होतं. तर मराठीतील आघाडीचे संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीत दिलं होतं. नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर कौशल यांनी संगीत दिलेल्या गाण्याचा आवाज घुमला. त्यामुळं यावर्षीचा प्रजासत्ताकदिन त्यांच्यासाठी नक्कीच खास होता.
हे वाचा-कलेचा सन्मान! सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण तर झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण जाहीर
या संदर्भात कौशल यांनी ट्वीट करून आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. कौशल यांनी या ट्वीटमधून त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिल आहे की, ‘महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घडवणाऱ्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक फ्लोटमध्ये गोंधळ परंपरेवर आधारित माझे संगीत असेल ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मी माझ्या मित्रांशिवाय हे करू शकलो नसतो. अमित पाध्ये, अनिल करंजवकर, सिद्धेश जाधव, नंदेश उमप, गायिका अमृता खोडके-दहिवेलकर, प्रगती जोशी, मधुरा परांजपे आणि विवेक कांबळी, यांचे आभार.’
कौशल इनामदार यांच्या कामाविषयी सांगायचं झालं तर, ‘मराठी अभिमान गीत’ हे देखील त्यांनी संगीतबद्ध केलं आहे. त्यांची अनेक गाणी महाराष्ट्राच गाजली. ‘बालगंधर्व’, ‘अजिंठा’ सारख्या सिनेमांसाठी त्यांनी संगीत दिलं आहे. ‘सारेगमपा’ सारख्या प्रसिद्ध कार्यक्रमात ते परीक्षक म्हणून दिसले आहेत. कौशल इनामदार यांना ‘रघुपती राघव राजाराम’ या नाटकासाठी महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.