घरी बहिणीचं लग्न तोंडावर आलं असतानाच समोरून बिग बॉसमधून फोन आला. आता काय करायचं, बहिणीच्या लग्नाची तयारीही खूप महत्त्वाची आणि बिग बॉसची ट्रॉफीही, अशी द्विधा मनस्थिती काही महिन्यांपूर्वी अक्षय केळकरची झाली होती.
आईशी बोललो, बाबांशीही बोललो, पण निर्णय काय घ्यावा, हे सुचत नव्हतं. बहिणीवरचं प्रेम की बिग बॉसचा जगावेगळा गेम, अशा कोंडीत पडलो होतो. त्यावेळी श्रद्धाने स्वतःहून येऊन काही हरकत नसल्याचं सांगितलं. जातोयस, पण येताना सोबत बिग बॉसची ट्रॉफी घेऊन येच, मी माझ्या रुखवतावर सजवेन, असं तिने सांगितलं.
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील शंभर दिवसांचा प्रवास सुरु करण्यापूर्वी निरोप घेताना मन भरून आलेलं. पण श्रद्धाला मिठी मारून बिग बॉसचा प्रवास सुरु केला. या शंभर दिवसात खूप मजा केली पण बहिणीच्या लग्नाच्या तयारीत आपण नसल्याचं थोडं दुःखही होतंच, असं अक्षय सांगतो.
फॅमिली एपिसोडमध्ये जेव्हा आई आणि श्रद्धा बिग बॉसच्या घरी आले, तेव्हा मात्र माझा बांध फुटला. पण तेव्हाही जाताना तिने मला आठवण करून दिली, की लग्नात ट्रॉफी हवीच आहे. या तिच्या वाक्यांनी नवा हुरूप आला आणि रेस्ट इज द हिस्ट्री…
“बिग बॉस सिजन ४ चा विनर आहे… अक्षय केळकर” असं म्हटल्यावर सगळ्यांनीच बघितलं असेल की काही क्षण मी डोळे बंद केले होते. तेव्हा हा अख्खा प्रवास डोळ्यासमोरून निघून गेला. निरोप देतानाचा आई, श्रद्धा, बाबा, रमा यांचे भरलेले डोळे दिसले आणि त्याच डोळ्यांना पुन्हा भरून येण्याचं निमित्त मिळालं, याचा आनंद मला झाला, असंही अक्षय केळकरने मटाशी बोलताना सांगितलं.
हेही वाचा : जिंकलेल्या रक्कमेचं काय करणार अक्षय केळकर, अनेकांनी केलं निर्णयाचं कौतुक
माझा आनंद हा जगावेगळा असल्याचं श्रद्धा सांगते. ‘अनेक भाऊ त्यांच्या बहिणींना शब्द देतात पण प्रत्येकालाच तो पाळणं जमत नाही. तो जिंकल्याचा अभिमान आहेच पण त्याने दिलेला शब्द त्याने खरा करून दाखवला याचा मला जास्त आनंद आहे. आज लग्नाला येणारे सगळेच माझ्यासोबत तिलाही (बिग बॉसची ट्रॉफी ) प्रेमाने बघत आहेत’ अशा भावना श्रद्धा केळकर हिने व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा : संजय दत्तला ७२ कोटींची संपत्ती दान, पण निशा पाटलांची शेवटची इच्छा अधुरीच राहिली