नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील असलोद गावात राहणाऱ्या गणेश माळी या आठ वर्षीय विद्यार्थ्याच्या जीवनसंघर्षाची ही गाथा… आपल्या मनात शंका आलीच असेल की आठ वर्षांच्या मुलाच्या आयुष्यात काय संघर्ष? पण त्याच्या जगण्यातील अडचणी पाहून आपल्या डोळ्यातही अश्रू आल्या खेरीज राहणार नाही.
अत्यंत निरागस आणि पाहता क्षणी मोहित करणारा आठ वर्षांचा गणेश आनंद माळी हा दुसरीत शिकतो. मात्र नियतीने या गोंडस चेहऱ्याची क्रूर थट्टा केली. आठ वर्षाच्या गणेशला जन्मापासून दोन्ही हातच नाही. तरी त्याची जगण्यासोबतची लढाई काही कमी झालेली नाही. त्याला हात नसताना देखील त्याने वयाच्या अवघ्या आठ वर्षात आपल्या दिवंगत्वावर मात करत शिक्षणासाठी घेतलेली भरारी भल्याभल्यांना अचंबित करणारी आहे.
काही कौटुंबिक कारणास्तव लहानग्या वयात आई घर सोडून गेल्याने गणेशच्या पालन पोषणाची जबाबदारी त्याचे वडिलच सांभाळत आहेत. सकाळी चार वाजता उठून त्याचे वडील त्याच्या नित्यचर्येसाठी त्याल मदत करत आहेत. मग घरी तयार होऊन शिक्षणासाठी गणेश जिद्दीने शाळा गाठत आहे
विशेष म्हणजे गणेशला हात नसल्याने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी तो पायाने अक्षर गिरवण्याचं काम करत आहे. पायाने लीलया लिखाण करण्यासोबतच, मोबाईलवर गेम देखील त्याला पायानेच खेळता येतात.
जेवणाचा प्रश्न म्हणाल तर मग याच पायाच्या सहाय्याने अन्न तोडून, पायानेच चमच्याने सहाय्याने त्याला खाताना पाहिल्यास त्याच्या संघर्षाची अनुभूती सर्वांनाच होईल. तर वर्गातील अन्य मित्रही त्याच्या दिनचर्येसाठी त्याला मदत करतातच.
या कोवळ्या वयातही त्याची शिक्षण आणि खेळातील अभिरुची त्याचं दिव्यंगत्व थांबवू शकलेले नाही. शिक्षणासोबत खेळातील त्याची आवड आणि मैदानातील त्याची चपळता भल्या भल्यांना अवाक करणारी आहे. पण घराच्या अठरा विश्व दारिद्र्यापुढे तो आणखीन किती तग धरणार हा प्रश्न त्याच्या शिक्षकांसह गावातील त्यांच्या शुभचिंतकांनाही भेडसावत आहे.
वडील मोलमजुरी करुन कसाबसा कुटुंबाची गुजराण करत असल्याने आजी आजोबांच्या देखरेखीखाली राहणाऱ्या गणेशला शासन स्तरावरुनच कृत्रीम अवयवांसाठी आणि त्यांच्या जीवनाच्या लढाईसाठी मतदीची अपेक्षा त्याच्या जवळची मंडळी करत आहेत.
हेही वाचा : आई मला माफ कर, तुला चांगले दिवस दाखवायची इच्छा होती, CA ची तयारी करणाऱ्या तरुणाचं टोकाचं पाऊल
बुद्धी आणि जिद्दीचा धनी असलेल्या गणेशची आर्थिक झोळी खाली असली तरी त्याचा जगण्याचा हा संघर्ष अनेकांना तोंडात बोटे घालायला लावणारा आहे. चिमुकल्या वयात मायेची ममता मुकलेल्या या गणेशला आता आपल्या मदतीची प्रतिक्षा आहे. त्यामुळे मायबाप सरकारने पुढे येऊन त्याच्यासाठी कृत्रिम अवयवांची सोय करुन दिल्यास आणि त्याला शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ दिल्यास गणेश आगामी काळात इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.
हेही वाचा : मम्मी-पप्पा दार उघडा, मुलगा हाका मारत राहिला, मात्र बंद दरवाजाआड घडत होतं भयंकर