हेमंत ढोमेनं सांगितला शाहरुख खानचा १८ वर्षांपूर्वीचा तो किस्सा म्हणाला, ‘असं असतं स्टारडम’


मुंबई : शाहरुख खान याला बॉलिवूडचा किंग खान म्हटलं जातं. केवळ देशातच नाही तर परदेशातही शाहरुखची अफाट लोकप्रियता आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्याचा तब्बल चार वर्षानंतर पठाण सिनेमा प्रदर्शित झाला आहे. देशा-परदेशात पठाण सिनेमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यावरून पुन्हा एकदा शाहरुख खानच्या लोकप्रियता किती अफाट आहे,हे दिसून आलं आहे.

पठाण सिनेमा बॉक्स ऑफिसवर सातत्यानं नवीननवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधी बेशरम रंग गाण्यात दीपिकानं परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यावरून सिनेमावर आणि शाहरुख खानवरून टीकेची झोड उठली होती. परंतु आता हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याला मिळालेल्या प्रतिसाद पाहून शाहरुखला आणि सिनेमाला विरोध करणाऱ्यांची बोलती बंद झाली आहे. शाहरुखच्या पठाण सिनेमाला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसाद पाहून त्याची लोकप्रियत किती अफाट आहे, याचा अंदाज आला आहे. शाहरुख खानच्या याच लोकप्रियतेची एक आठवण लेखक,दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे यानं सोशल मीडियावर शेअर केली आहे.

हेमंत ढोमे याची पोस्ट

हेमंत ढोमे इंग्लंडमध्ये असतानाचा किस्सा त्यानं ट्विटरवरून शेअर केला आहे. हा किस्सा हेमंतनं तीन ट्विटमध्ये शेअर केला आहे. हेमंतनं पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘मी इंग्लंडमधे असताना शिक्षण संपल्यानंतर काही काळ नोकरी करत होतो… एक दिवस कामावर निघालो ट्युब स्टेशनवर आलो आणि कळलं आजचा प्रवास मोफत असणार आहे… चौकशी केल्यानंतर लक्षात आलं आज लेस्टर स्केअरला शाहरूख खानचा कार्यक्रम आहे. म्हणून तिथल्या सरकारने सर्वांसाठी प्रवास मोफत ठेवलाय’

हेमंतनं त्याच्या दुसऱ्या ट्विटमधून शाहरुख खानचं भरभरून कौतुक केलं आहे. लोकप्रियता म्हणजे काय असते हे त्यानं या ट्विटमधून सांगितलं आहे. हेमंतनं लिहिलं आहे की,’मग लक्षात आलं ते स्टारडम म्हणजे काय असतं… आपल्या देशाबाहेर आपल्यासाठी तिथलं सरकार प्रवास मोफत करतं तुमचं काम सेलिब्रेट करतं! कमाल! आज #Pathaan च्या निमित्ताने १८ वर्षांपूर्वीचा किस्सा आठवला… आजही त्या माणसाची जादू कायम आहे… हे खूप प्रेरणादायी आहे.

सर्वसामान्य घरातून आलेला शाहरुख खान याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्याबद्दल हेमंतनं त्याच्या तिसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘एका सामान्य घरातून आलेला एक सामान्य मुलगा आपल्या मेहनतीनं आणि हुशारीनं कुठल्या कुठे जाऊ शकतो याचं हे उदाहरण… आपण शांतपणे आपलं काम करावं मेहनत करावी… आपलं कामंच बोलतं! बाकी अडचणी वगैरे येतच राहतात…आपण पुढे जात रहावं! ‘

हेमंत ढोमे हा मराठीमधील उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जातो, तसाच तो आता यशस्वी दिग्दर्शक म्हणूनही ओळखला जात आहे. हेमंतनं दिग्दर्शित केलेले झिम्मा, सनी हे मराठी सिनेमांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. तसंच हेमंतनं दिग्दर्शित केलेल्या झिम्मा सिनेमाचा दुसरा भाग दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याचं नुकतंच त्यानं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना झिम्मा २ ची उत्सुकता लागली आहे.

Source link

hemant dhomehemant dhome jhimma 2hemant dhome tweetPathaan Controversypathaan movepathaan movie box office collectionShahrukh Khanपठाण सिनेमाशाहरुख खानहेमंत ढोमे
Comments (0)
Add Comment