कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबच्या राजकारणातील बडे नाव आहे. काँग्रेस पक्षात असताना अमरिंदर सिंग अनेक वर्षे पंजाब आणि काँग्रेस पक्षात राष्ट्रीय पातळीवर स्वत:चा दबदबा राखून होते. १९६३ ते १९६६ या काळात ते भारतीय लष्करात होते. अमरिंदर सिंग यांचे वडील पटियाला राज्याचे शेवटचे राजा होते. त्यामुळे पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांच्या नावाचा प्रचंड दबदबा होता. अमरिंदर सिंग यांनी पंजाबमधील राजकारणाची सूत्रे अनेक वर्षे आपल्याला हातात ठेवली होती. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये अमरिंदर सिंग यांच्यावर काँग्रेस हायकमांडची खप्पामर्जी झाली होती. त्यामुळे अमरिंदर सिंह यांना पक्षात बाजूला सारण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. या सगळ्या घडामोडींमुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी १८ सप्टेंबर २०२१ रोजी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंजाब लोक काँग्रेस (पीएलसी) हा नवा राजकीय पक्ष स्थापन केला होता. वैयक्तिक करिष्म्याच्या जोरावर आपल्या पक्षाला चांगल्या जागा मिळतील, अशी अमरिंदर सिंग यांची अपेक्षा होती. परंतु, विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर त्यांचा हा अंदाज फोल ठरला होता. या अपयशामुळे अमरिंदर सिंग यांनी नंतरच्या काळात आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला होता. अमरिंदर सिंग हे त्यांच्या सडेतोड आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. वेळ पडल्यास आपल्या पक्षाच्या वरिष्ठांना खमकेपणाने दोन शब्द सुनवायला मागेपुढे न पाहणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. याच अमरिंदर सिंग यांच्या नावाची आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी चर्चा सुरु आहे. परंतु, याबाबत अद्याप कोणताही ठोस माहिती समोर आलेली नाही.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या ‘इच्छे’मागे राजकीय समीकरणे?
गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महनीय व्यक्तींविरुद्ध त्यांनी केलेल्या वक्तव्यांवर विरोधकांनी त्यांच्याविरोधात आणि भाजपविरोधात रान उठवले होते. कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन हटवण्याची मागणी लावून धरण्यात आली होती. त्यामुळे भाजपची कोंडी झाली होती.
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधकांकडून या मुद्द्याचे भांडवल केले जाऊ शकते, असा अंदाज भाजपला होता. तरीही केंद्र सरकारकडून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कोणताही कारवाई झाली नव्हती. याच मुद्द्यावर बोट ठेऊन त्याबाबतची खदखद राजकीयदृष्ट्या शिवसेना वाढवत असल्याचा अंदाज भाजपच्या धुरिणांना आला होता. त्यामुळेच राज्यपाल कोश्यारी यांना पदावरुन दूर करण्यासाठी हालचालींना सुरुवात झाली होती. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना याबाबत अंदाज दिल्यानंतरच कोश्यारी यांनी राज्यपालपदावरून मुक्त होऊन वाचन, चिंतन, मनन याच्यात वेळ घालवण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.