जवळपास चार वर्ष पडद्यावरून दूर राहिल्यानंतर शाहरुख पूर्णपणे बादशाह स्टाइलमध्ये परतल्याने चाहते भलतेच आनंदीत आहेत. सोशल मीडियावरही प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत. या सगळ्यात शाहरुखनेही ‘पठाण’ शैलीत सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचं हे ट्वीट व्हायरल झालं.
किंग खानने ‘पठाण’ सिनेमातला डायलॉग लिहिला, ‘तू देशासाठी काय करू शकतोस…’ आणि ट्वीट केले, ‘प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आपल्या संविधानाने आपल्याला जे काही दिले आहे ते आपण जपले पाहिजे आणि आपल्या देशाला नवीन उंचीवर नेले पाहिजे. भारत चिरायु हो।’ बादशाहचं हे ट्वीट सर्वांच्याच मनाला भिडले.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ २५ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सिनेमाविरोधात अनेक ठिकाणी निदर्शनेही झाली, मात्र असे असतानाही सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ५१ कोटींची कमाई केली. तर जगभरात १०० कोटींहून अधिक कमाई करणारा पहिला बॉलिवूडपट ठरला.
शाहरुख खानचे आगामी सिनेमे
शाहरुख खान शेवटचा ‘झिरो’ सिनेमात दिसला होता. हा सिनेेमा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला. यानंतर शाहरुख रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये छोट्या भूमिकेत दिसला. आता ‘पठाण’मधून तो रुपेरी पडद्यावर परतला. यासोबतच त्याच्याकडे राजकुमार हिराणी यांचा ‘डंकी’ आणि दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीचा ‘जवान’ सिनेमा आहे.