महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या न्यायाधीश पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामध्ये यशस्वी झालेल्या ६३ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात निरंजनचा ४२ क्रमांक आहे. निरंजन हा मूळचा पुण्यातील नऱ्हे गावातील रहिवासी. त्याचे वडील शरद खलाटे जिल्हा सत्र न्यायालयातून ‘हेड बेलिफ’ म्हणून निवृत्त झाले आहेत.
एकत्र कुटुंबात वाढलेल्या निरंजनचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे झाले. त्यानंतर त्याने आयएलएस लॉ कॉलेज येथून बीए एलएलबी ही पदवी मिळवली. त्याला दहावीला ९३.४० टक्के गुण होते; तर पदवी परीक्षा ९१.५० टक्के गुण मिळवित यश संपादित केले. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कायद्याची पदव्युत्तर पदवी (एलएलएम) मिळवली. निरंजनने कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर प्रत्यक्षात वकिली केली नाही.
पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेवरच लक्ष केंद्रीत केले. शिक्षण पूर्ण होताच, निरंजनने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या न्यायाधीशाच्या परीक्षेसाठी अर्ज केला. मार्च २०२२पासून ही परीक्षा प्रक्रिया सुरू होती. नऊ ते १७ जानेवारी २०२३ या कालावधीत पात्र उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. त्यानंतर यशस्वी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.
लहानपणापासूनच विधीक्षेत्राचा ओढा
वयाच्या पंचविशीत यशाला गवसणी घालणारा निरंजन खलाटे म्हणाला, ‘माझे वडील शिवाजीनगर न्यायालयात नोकरीस होते. जवळपास ३० वर्षे सेवा केल्यानंतर ते २०२१मध्ये निवृत्त झाले. लहानपणापासूनच न्यायालयातील गोष्टी ऐकत होतो. त्यामुळे मलाही त्या क्षेत्राची सुरुवातीपासून ओढ होती. दहावी झाल्यानंतर मी कायद्याच्या क्षेत्रातच करिअर करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसारच वाटचाल केली. कायद्याची पदवी असो की न्यायाधीश पदाची परीक्षा यामध्ये मला वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळेच मी सर्व पातळ्यांवर पहिल्या प्रयत्नात यश मिळवू शकलो.’ विधिज्ञ गणेश शिरसाट आणि राजन गुंजीकर यांचेही त्याला मार्गदर्शन लाभले.
वडिलांकडे पाहून कायद्याच्या क्षेत्राची ओढ निर्माण झाली. याच क्षेत्राचे स्वप्न पाहिले. वडिलांच्या मार्गदर्शनामुळे ते स्वप्न पूर्णही करू शकलो, याचा आनंद आहे.
– निरंजन खलाटे