सर्व्हेमध्ये आज लोकसभेची निवडणूक झाल्यास कोणाची सत्ता येईल या सोबत सध्याच्या मोदी सरकारबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. सर्व्हेतून पुन्हा एकदा देशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार येणार असल्याचे लोकांनी म्हटले आहे. मोदी सरकार ९ वर्ष सत्तेत आहे आणि ६७ टक्के लोकांनी त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. ऑगस्ट २०२२मध्ये झालेल्या सर्व्हेच्या तुलनेत या आकडेवारीत ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये ३७ टक्के लोक मोदी सरकारच्या कामकाजावर नाराज होते. आता हे प्रमाण १८ टक्क्यांनी घटले आहे.
वाचा- लोकसभेची निवडणूक आज झाल्यास कोणाची सत्ता येणार? महाराष्ट्रात भाजपला बसणार धक्का!
लोकसभेच्या ५४३ जागांपैकी एनडीएला २९८ जागा मिळतील असे म्हटले आहे. तर युपीएला १५३ जागा मिळू शकतात. राज्यांचा विचार करता एनडीएला आसाम, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यात मोठा फायदा होऊ शकतो. तर युपीएला कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहार या ३ राज्यात फायदा होईल.
महाराष्ट्रातील निकाल धक्कादायक
राज्यात सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाआघाडी आहे. अशात राज्यात आता लोकसभेची निवडणूक झाल्यास युपीएला ३४ जागांवर विजय मिळेल असे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे. २०१९च्या लोकसभेत त्यांना ५ जागा मिळाल्या होत्या.
काही महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे आणि काही आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. त्याच्या सोबत १२ खासदार देखील शिंदे गटात दाखल झाले होते. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर भाजप अधिक सक्रिय आणि अक्रमक झाला, त्यांनी राज्यात मिशन ४५ ची घोषणा दिली होती. पण ‘मूड ऑफ नेशन’मध्ये मात्र युपीएला ४८ पैकी ३४ जागा मिळतील असे म्हटले आहे. याचा अर्थ एनडीएला फक्त १४ जागा मिळतील. ‘मूड ऑफ नेशन’च्या या सर्व्हेमुळे भाजप आणि शिंदे सरकारचे टेन्शन वाढले आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या. तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेने १८ याचा अर्थ युतीला म्हणजे एनडीएला ४१ जागा मिळाल्या होत्या. मूड ऑफ नेशनच्या सर्व्हेनुसार एनडीए ४१ वरून थेट १४ जागांवर येईल. २०१९ मध्ये राष्ट्रवादीला ४ आणि काँग्रेसला १ जागा मिळाली होती. ही संख्या आता ३४ वर जाणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत शिवसेना देखील असेल.
महाराष्ट्राप्रमाणेच युपीएला कर्नाटक आणि बिहारमध्ये मोठा फायदा होऊ शकतो असे म्हटले आहे. कर्नाटकात त्यांना १७ जागा मिळू शकतात. २०१९ मध्ये ही संख्या फक्त २ इतकी होती. तर बिहारमध्ये १ वरून ते २५ वर पोहोचू शकतात.