रितेशच्या सगळ्याच व्हिडिओंना प्रेक्षक भरभरून दाद देताना दिसतात. मात्र त्याने नुकताच शेअर केलेला व्हिडिओ चाहत्यांच्या रागाचं आणि ट्रोलिंगचं कारण ठरला आहे. रितेशने ऑनलाइन गेमिंगचं केलेलं प्रमोशन अनेकांना आवडलेलं नाहीये. रितेशने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला ज्यात तो झुपी या गेमिंग अॅपवर लुडो खेळताना दिसतोय. यात आपण २५ हजार जिंकल्याचं त्याने म्हंटलंय. मात्र त्याचं हे प्रमोशन चाहत्यांना आवडलेलं नाही. असे गेमिंग अॅप लोकांना कर्जबाजारी करतात, हा एक प्रकारचा जुगार असतो आणि तुम्ही त्याचं प्रमोशन करताय तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती दादा अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर चाहत्यांनी दिल्या आहेत.
एका युझरने प्रतिक्रिया देत लिहिलं, ‘आता कुठे मी तुमचा चाहता झालो होतो आणि तुम्ही हा व्हिडिओ टाकून सगळी मजा खराब करून टाकली. कृपया हे सगळे अॅप प्रमोट करू नका.’ दुसऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिलं, ‘ही अपेक्षा नव्हती दादा तुमच्याकडून. प्रत्येक वेळेस आपणच जिकणार अशी अपेक्षा ठेवनारा गेम म्हणजे जुगारच.’ आणखी एकाने लिहिलं, ‘तुम्हाला अनेक तरुण फॉलो करतात. त्यांना तुम्ही असं काही दाखवून चुकीचं वळण लावताय. काहीतरी चांगलं शिकवायचं सोडून हे काय दाखवताय. हे असल्या अॅपचं प्रमोशन करू नका.’ अशा अनेक प्रतिक्रया देत चाहत्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.