त्यानुसार त्यांनी पक्षाकडून कोणताही गोंधळ झाला नसल्याचे सांगत याला संपूर्णत: तांबे कुटुंबीयच जबाबदार असल्याचे ते म्हणाले. उमेदवारी झाल्यावर माझ्याकडे येऊन आभार व्यक्त करणारे डॉ. तांबे यांना त्याचवेळी आपल्याऐवजी मुलाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी का केली नाही? असा सवालही पटोले यांनी केला.
महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी पटोले अहमदनगरला आले होते. त्यावेळी त्यांनी आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. स्वत: उमेदवार पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा ग्रामीण जिल्ह्याचे प्रभारी अध्यक्ष किरण काळे यांच्यासह तिन्ही पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दोनच दिवसांपूर्वी पटोले यांनी जिल्ह्याची काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त केली आहे. त्यानंतर झालेल्या या बैठकीला जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थि होते.
बैठकीनंतर पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यांना एबी फॉर्मच्या गोंधळासंबंधी विचारले असता ते म्हणाले, पक्षाची उमेदवारी देणे ही एका दिवसातील प्रक्रिया नसते. या मतदारसंघातही ती खूप लवकरच सुरू झाली होती. यासाठी मी, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आदी नेत्यांची बैठक झाली. त्यात डॉ. सुधीर तांबे यांनाच पुन्हा संधी देण्याचा निर्णय झाला. तो जाहीरही झाला. त्यानंतर डॉ. तांबे भेटायला आले. त्यांनी उमेदवारी दिल्याबद्दल आभारही व्यक्त केले. तेव्हा आणि त्यानंतरही त्यांनी आपल्याऐवजी मुलगा सत्यजीत यांना उमेदवारी देण्याची मागणी केली नव्हती. तशी ती केली असती, तर तेव्हाच त्यावर विचार झाला असता.
पुढे सत्यजीत यांच्यासंबंधी भाजपच्या संबंधाने वेगळी कुजबुज ऐकायला मिळू लागली. आम्ही सावधच होतो. पक्षाचा एबी फॉर्म उमेदवाराचं नाव टाकून आणि एकच प्रत दिली जाते. या प्रकरणात आम्ही दोन आणि तेही कोरे फार्म दिले होते. त्यांच्या घरातील वादात आम्हाला पडायचे नव्हते. तुमच्यापैकी जो कोणी उमेदवार ठरेल, त्याचे नाव टाकून अर्ज दाखल करा, असे त्यांना सांगितले होते. शेवटपर्यंत डॉ. तांबे अर्ज भरणार असे सांगत होते. ऐनवेळी डॉ. तांबे यांनी अर्ज भरलाच नाही, सत्यजीत यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
पक्षाने तांबेंना २ फॉर्म तेही कोरे दिले…
ते सांगतात की सत्यजीतच्या नावाचा एबी फॉर्म नव्हता. आम्ही तर दोन्ही कोरे फॉर्म दिले होते. त्यावर एकच नाव कोणी टाकले माहिती नाही. शिवाय एबी फॉर्मवर दुसऱ्या म्हणजे पर्यायी उमेदवाराचे नाव टाकण्याचाही एक पर्याय असतो. तर मग तो का वापरला नाही? त्यावेळी माझ्याशी का संपर्क केला नाही? त्यांच्या घरातील वादात आम्हाला पडायचे नव्हते. मात्र, पक्षाकडून काही चूक नको म्हणून आम्ही दोन फॉर्म तेही कोरे दिले होते. यापेक्षा आणखी काय करू शकतो. ज्यांनी एबी फॉर्म कचऱ्यात टाकून दिला, त्यांना आमची बाजू ऐकून न घेता कारवाई केली, असे बोलण्याचा काय अधिकार आहे? यावरून माध्यमं आणि लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? कोणाचे चुकले हे ठरवावे, असेही पटोले म्हणाले.