सर्वांत तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तीवान, बुद्धीवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे. सृष्टीचा जगत्चालक असून, तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे, असा संदर्भ रथसप्तमीला आहे. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे. सूर्य स्वयंप्रकाशी आहे. अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात. सूर्य ग्रहांचा राजा असून, त्याचे स्थान नवग्रहांमध्ये वरचे आहे.
रथसप्तमी पूजाविधी
रथसप्तमी हा अदिती आणि कश्यप यांचा पुत्र ‘सूर्य’ याचा हा जन्मदिवस आहे, असे मानले जाते. या दिवशी सूर्य पूजन केले जाते. सूर्य पूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य दिले द्यावे. रथसप्तमीदिनी तुळशीपुढे सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून महिला त्याचे पूजन करतात. अंगणात दीप प्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखविला जातो. सूर्यरथाला असणारे सप्त अश्व आठवड्यातील सात वार दर्शवतात. रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिक आहे, असे मानले जाते.
या पुराणात आहे महत्व
ब्रह्म, स्कंद, शिव, अग्नी, मत्स्य, नारद आणि भविष्य पुराणात या दिवसाचे महत्त्व सांगितले आहे. माघ महिन्याच्या शुक्लपक्षाच्या सातव्या तिथीला तीर्थ-स्नान आणि सूर्य उपासना केल्याने रोग दूर होतात आणि वयही वाढते, असे या पुराणांमध्ये सांगितले आहे. या दिवशी केलेले दान शाश्वत फळ देते. तसेच या दिवशी उपवास केल्याने अपत्य सुख मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात.