मलंगगड परिसरातील जकात नाका भागात पप्प्या बाळ्या पवार हे पत्नी सखू आणि लहान मुलीसह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी पहाटे हे कुटुंब त्यांच्या झोपडीत झोपलेलं असताना अचानक एक बिबट्या त्यांच्या झोपडीत शिरला आणि पप्या पवार यांच्यावर हल्ला चढवला. या गोंधळाने जाग्या झालेल्या सखुबाईने त्वरित मुलीला बाजूला घेत हातात काठी घेऊन बिबट्याचा हिमतीने प्रतिकार केला आणि बिबट्याला पळवून तेथून लावले.
मात्र, या दरम्यान बिबट्याशी झालेल्या झटापटीत तिचा पती पप्या हा गंभीर जखमी झाला आहे. यानंतर त्याला तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र, यानंतर अतिशय हिमतीने आपल्या कुटुंबाचं बिबट्यापासून रक्षण करणाऱ्या धाडसी सखुबाईचं कौतुक होत आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सकाळी वनविभागाने बदलापूर विभागीय अधिकारी विवेक नातू, वन विभागाचे मलंगगड मंडळ अधिकारी विठठल दरेकर, यांसह हिललाईन पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक करडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पडवळ यांनी घटनास्थळी भेट देत वन विभागला योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर हा बिबट्या अन्नच्या शोधात मानवी वस्तीत आला असावा असे थेतील लोकांचे मत आहेत. मानवी वस्तीत कुत्रे,गुरे असतात. त्याची शिकार करण्यासाठी तो आला असावा असे प्राणीमित्र यांचे म्हणणे आहे. दरम्यान यापूर्वीही बिबट्या हा मलंगगड आणि परिसरात दिसला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात बिबट्या हा कल्याण पूर्वेतील भर वस्तीत आला होता.