हे चारही आरोपी सराईत असून राज्यातील विविध पोलीस ठाण्यात त्यांच्या नावे 12 गुन्हे दाखल आहेत. याबाबत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी आज पत्रकार परिषदेत घेऊन या गुन्ह्येगारांची माहिती दिली. यावेळी आरोपी लोकांची कशी फसवणूक करायचे, याची पद्धतही त्यांनी सांगितली.
मुंबई-आग्रा महामार्गावर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये काही संशयित इसम मुंबई पासिंगच्या वाहनाने संशयितरित्या फिरत असल्याची खात्रीशिर माहिती काल रोजी उशिरा शिरपूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दहिवद गावाकडे जावून संशयित इसम आणि वाहनाचा शोध सुरु केला. साखर कारखान्याजवळ महाराष्ट्र ०२ बीझेड ३४३९ गाडी व त्यात चार जण मिळून आले. त्यांना त्यांचं नाव विचारून त्यांच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्यांनी त्यांची नावे सांगितली अन् गुन्ह्यांची मोडस ऑपरेंडी देखील सांगितली.
त्यावरुन त्यांची व वाहनाची तपासणी केली असता गाडीत ९४ एटीएम कार्ड मिळून आले. ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ व त्यांच्या पथकाने केली.