इतके दिवस आम्ही गद्दारांनाच हिरे समजत होतो; भाजप पदाधिकाऱ्याच्या प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुंबई : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे पदाधिकारी अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शुक्रवारी अनेक समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. ‘आम्ही असंख्य लोकांना भारतीय जनता पक्षात चांगल्या पदावर बसवले; परंतु ५० जण भाजपच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे पक्षाला काय झाले, हेच कळत नाही. पक्षाला आता आमची गरज राहिली नाही,’ अशा शब्दांत हिरे यांनी शुक्रवारी भाजपवर टीकास्त्र सोडले.

पक्षप्रवेशानंतर हिरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘कालपासून भाजपला माझी अचानक आठवण आली. प्रदेशाध्यक्षांपासून सर्वांचे फोन आले. मात्र कितीही खोके, कितीही सत्ता दिली तरी उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द मी मोडणार नाही, असे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले. पैसा आणि सत्तेसाठी बाप बदलणारा मी नाही. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना पक्ष उभा राहण्यासाठी काम करू. येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे यांना बसविल्याशिवाय राहणार नाही,’ असा निर्धार या वेळी त्यांनी व्यक्त केला.

‘माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असता मी जनआंदोलन केले. मात्र, पक्षाने शेतकऱ्याला मरू दिले. शेतकऱ्याला वाचवू न शकणाऱ्या पक्षाच्या नेतृत्वात मी काम करणार नसल्याने मी भाजपचा त्याग केला आहे,’ असेही ते म्हणाले.

‘आम्ही गद्दारांना ‘हिरे’ समजलो…’

‘बरे झाले पक्षातून गद्दार गेले आणि आम्हाला ‘हिरे’ सापडले. इतके दिवस आम्ही या गद्दारांनाच हिरे समजून पैलू पाडण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र काही उपयोग झाला नाही असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. गद्दार लोक स्वार्थासाठी जगत आहेत. त्यांना माणुसकी राहिलेली नाही. ‘वापरा आणि फेका’ अशी वृत्ती आहे,’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आपण लवकरच मालेगावात सभा घेणार असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. हिरे यांना पक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी शिंदे मंत्रिमंडळातील दादा भुसे यांना राजकीय शह दिल्याचे बोलले जाते. आगामी विधानसभा निवडणुकीत भुसे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून अद्वय हिरे यांना उतरविण्याचे स्पष्ट संकेत या वेळी देण्यात आले.

Source link

advay hireDada BhuseNashik District Central BankSanjay RautShivsenaUddhav Thackeray
Comments (0)
Add Comment