आईने मजुरीचे काम करून शिकविले
महेंद्रगड, हरियाणाची राहणारी, दिव्या तिच्या भावंडांमध्ये सर्वात मोठी आहे. ती तिची आई आणि दोन लहान भावंडांसोबत राहते. नागरी सेवा परीक्षेत तिचा हा पहिलाच प्रयत्न होता. दिव्याने पहिल्याच प्रयत्नात आयपीएस पद मिळवून संपूर्ण जिल्ह्याचा नावलौकिक मिळवला आहे. दिव्या लहान असतानाच तिचे वडिल देवाघरी गेले. तेव्हापासून तिच्या आईने इतरांच्या शेतात मजुरीचे काम करून घर चालवले आणि मुलांचे पालनपोषण केले.
दिव्याने तिचे प्राथमिक शिक्षण निंबी जिल्ह्यातील मनू स्कूलमधून पूर्ण केले. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तिने नवोदय विद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर सरकारी पीजी कॉलेजमधून तिने बीएस्सी पदवी पूर्ण केली आहे. दिव्या अनेकदा मुलांनाही शिकविण्याचे काम करायची. परीक्षा उत्तीर्ण होण्यात नशिबापेक्षा कठोर परिश्रमाची भूमिका जास्त असते, असे तिला वाटते. निश्चयाला कठोर परिश्रमाची साथ मिळाली तर आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकतो असे ती सांगते.
१० तास अभ्यास
दिव्याचे घर खूप लहान आहे. पण त्यामुळे अभ्यास करताना तिला अडचणींचा सामना करावा लागला. त्यात तयारीसाठी तिने कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. सेल्फ स्टडीच्या जोरावर तिने आपले ध्येय साध्य केले. ती दररोज १० तास अभ्यास करायची आणि कधीही घराबाहेर पडली नाही. खाणे, अभ्यास आणि झोपणे, हे तिचे तयारीचे वेळापत्रक होते.
दिव्या तिच्या यशाचे श्रेय तिच्या आईला देते. जिने नेहमी आपल्या मुलीचा हात धरला आणि तिला वडिलांची उणीव भासू दिली नाही. तिची आई स्वतः मजूर म्हणून काम करते पण दिव्याच्या तयारीत कोणतीही अडचण येऊ दिली नाही.