शाहरुख खान पठाणमधून चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला खरा पण तो चाहत्यांच्या मनातून कधी गेलाच नव्हता. आजही मराठा मंदिर चित्रपटगृहाचं नाव घेतलं की शाहरुखचा दिलवाले दुल्हनिया सिनेमा आठवतो. या सिनेमाला २८ वर्ष पूर्ण झाली. तरी मराठा मंदिरात या सिनेमाचे शो लावले जात होते. विशेष म्हणजे एवढ्या वर्षांनंतरही सिनेमाची तिकीटं विकली जात होती. त्यामुळेच या चित्रपटगृहात डीडीएलजे सिनेमाला विशेष स्थान आहे. कोणतेही सिनेमे आले तरी डीडीएलजेचं पोस्टर इथून हटवलं जात नाही.
१९९५ मध्ये प्रदर्शित झालेला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमा २८ वर्ष मराठा मंदिरात दाखवण्यात आला. त्यामुळे त्याच चित्रपटगृहात शाहरुखच्या पठाणचे जेव्हा शो लागतात तेव्हा बादशाहच्या चाहत्यांसाठी तो दुग्धशर्करा योगच असतो. चित्रपटगृहाबाहेरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन्ही सिनेमांचे पोस्टर दिसत आहेत. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीने मराठा मंदिराबाहेरचा हा फोटो शेअर केला. तिने फोटोला कॅप्शन देताना लिहिले, ‘या दोन फोटोंमध्ये एक प्रवास दिसतो जो आम्हा सर्वांना अजूनही लक्षात आहे. तसेच जर तुम्हाला पठाणची तिकीटं मिळू शकली नाही तर काय पाहायचं ते तुम्हाला माहीत आहे.
१९९५ पासून DDLJ मराठा मंदिरात दाखवला जात आहे
मराठा मंदिर हा मुंबईतील सिंगल-स्क्रीन सिनेमा हॉल आहे, जो १९९५ मध्ये शाहरुखचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ रिलीज झाल्यापासून या सिनेमाचे दररोज तिथे शो होतात. शाहरुखचे चाहते आजही सिनेमागृहात मोठ्या प्रेमाने हा चित्रपट पाहतात. म्हणूनच शाहरुखच्या कट्टर चाहत्यांसाठी मराठा मंदिर हे फक्त चित्रपटगृह नसून ती एक भावना आहे.